पुण्यात सोमवारपासून पाणीकपात; काही भागांत दिवसाआड, तर काही भागांत कमी प्रमाणात पाणी | पुढारी

पुण्यात सोमवारपासून पाणीकपात; काही भागांत दिवसाआड, तर काही भागांत कमी प्रमाणात पाणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरात सोमवारपासून पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचे वेळापत्रक आज जाहीर होणार असून काही भागात दिवसाआड, तर काही भागात कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जून महिना संपला तरी समाधानकारक पावसाला अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील साठा जवळपास तळाला पोहचला आहे.

त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची सूचना पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली होती. त्यानुसार प्रशासनाने पाणीकपातीचे नियोजन सुरू केले होते. मात्र, यासंबंधीचा निर्णय लांबला होता. दरम्यान आयुक्त विक्रम कुमार यांनी पाणीकपातीसंदर्भात गुरुवारी महापालिका अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात कशा पद्धतीने पाणीकपात लागू करायची यासंबंधीची चर्चा झाली. शहरात सरसकट दिवसाआड पाणीकपात लागू केली तर अनेक भागात दुसर्‍या दिवशी सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही, असे अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले.

त्यामुळे काही भागात दिवसाआड, तर काही भागात पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे निश्चित करण्यात आले.
यासंबंधीचे वेळापत्रक पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात येणार आहे. शुक्रवारी हे वेळापत्रक तयार होऊन प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारपासून ही कपात लागू होईल, असे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.

धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. अद्याप पाऊस सुरू झाला नसल्याने पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यानुसार शुक्रवारी पाणीपुरवठा कपातीसंबंधीचे नियोजन जाहीर केले जाईल व सोमवारपासून ही कपात लागू होईल.

                                                                               – विक्रम कुमार,

 

Back to top button