पिंपरी : हरकतीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्या : खा. बारणे | पुढारी

पिंपरी : हरकतीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्या : खा. बारणे

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागानुसार फोडण्यात आलेल्या मतदार याद्यांची विभागणी प्रभाग रचनेला अनुसरून झालेली नाही. मतदार यादीतील मतदारांची नावे शोधण्यासाठी दिलेला अवधी कमी पडत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला विनंती करून हरकती नोंदविण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की महापालिका निवडणूक शाखेने पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 1 जुलै 2022 पर्यंत मुदत दिली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रारुप मतदार याद्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी केवळ 8 दिवसांचा वेळ मिळाला आहे. हा कालावधी खूप कमी आहे.

प्रभागानुसार फोडण्यात आलेल्या मतदार याद्या परिपूर्ण प्रभाग रचनेला अनुसरून विभागणी केलेली नाही. सर्व प्रभागांमधील दीड ते अडीच हजार नावे मूळ प्रभागांमध्ये न राहता दुसर्‍या प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतील मतदारांची नावे शोधण्यासाठी संभाव्य उमेदवारांना व मतदारांना हरकतीसाठीचा अवधी कमी पडत आहे.

Back to top button