पिंपरी : रुग्णालयात चोर्‍या; उच्चशिक्षित चोरट्याला बेड्या | पुढारी

पिंपरी : रुग्णालयात चोर्‍या; उच्चशिक्षित चोरट्याला बेड्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे लॅपटॉप, मोबाईल चोरी करणार्‍या उच्च शिक्षित चोरट्याला वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पाच लाख 25 हजारांचे सात लॅपटॉप, 35 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. विकास संजय हगवणे (30, रा. भुकूम, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी थेरगाव येथील एका रुग्णालयातून लॅपटॉप चोरीला गेला. त्यानंतर 18 मे रोजी कस्पटे वस्तीतील एका रुग्णालयातून लॅपटॉप चोरीला गेला. दरम्यान, 25 मे रोजी डांगे चौकातील एका रुग्णालयातून मोबाईल चोरीला गेला. रुग्णालयात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस हैराण झाले होते.

दरम्यान, वाकड पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता तिन्ही घटनांमध्ये एकाच व्यक्तीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, वाकड पोलिसांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात विविध रुग्णालयात चौकशी केली. तसेच, मोठे हॉस्पिटल आणि लहान क्लिनिकला, मोबाईल, लॅपटॉप विक्री, दुरुस्ती करणार्‍या दुकानदारांना सूचना केल्या.सहाय्यक फौजदार बाबाजान इनामदार यांना माहिती मिळाली की, वाकड रोडवर एका लॅपटॉप विक्री दुरुस्तीच्या दुकानात पोलिसांनी सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती लॅपटॉप विक्रीसाठी आला आहे.

त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून हगवणे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्याकडे असलेला लॅपटॉप चोरीचा असल्याची कबुली त्याने दिली.आरोपीने चोरीचे मोबाईल आणि लॅपटॉप स्वतःचे आहेत, हे भासवण्यासाठी विघ्नहर्ता मोबाईल शॉपी, डेक्कन जिमखाना, पुणे या दुकानाच्या नावाने बिलबुक तयार केले. या बिलांचा वापर करून तो चोरी केलेले लॅपटॉप आणि मोबाईल स्वतःचे सांगून दुकानदारांना विकत होता. पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाख 25 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ज्या नागरिकांचे लॅपटॉप आणि मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेले आहेत, त्यांनी वाकड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त भोईटे यांनी केले आहे.

कोरोनानंतर चोर्‍यांचा सपाटा

आरोपी विकास हगवणे हा उच्च शिक्षित आहे. त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तो वाघोली येथील आयटी कंपनीत नोकरी करत होता. मात्र, कोरोना काळात त्याची नोकरी गेली. त्यानंतर त्याने वाकड, पिंपरी, भोसरी, चतुःशृंगी, कोथरूड परिसरातील रुग्णालयात चोर्‍यांच्या सपाटा लावला.

…म्हणून रुग्णालय टार्गेट
रुग्णालयात परिसरात नेहमी गर्दी असते. तसेच, नातेवाईक आपल्या गडबडीत असतात त्यामुळे चोरी केल्यानंतर रुग्णालयातून पळ काढणे सोपे जाते. या कारणांमुळे आरोपी हगवणे केवळ रुग्णालयांना टार्गेट करीत होता.

Back to top button