शिवसेनेत बंड; पुणे मात्र थंड, ना आंदोलन, ना निषेध | पुढारी

शिवसेनेत बंड; पुणे मात्र थंड, ना आंदोलन, ना निषेध

पुणे : राज्यातील शिवसेनेत उभी फूट असताना पुण्यातील शिवसेनेत मात्र शांतता आहे. गेल्या चार दिवसांपासून किरकोळ अपवाद वगळता एकनाथ शिंदे अथवा बंडखोर आमदारांविरोधात ना आंदोलन झाले ना निषेध व्यक्त झाला. त्यामुळे पुण्यातील शिवसैनिक संभ्रमात आहेत की बॅकफूटवर गेले आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी रात्री जाहीर होत असतानाच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेला खिंडार पाडण्याचे काम केले. या राजकीय भूकंपाचे पडसाद गेले चार दिवस उमटत असून, हा संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे.

त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर संपूर्ण मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता शुक्रवारपासून (दि.24) महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत बंडखोर आमदारांविरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. पुण्यात किरकोळ वैयक्तिक स्वरूपाची आंदोलने वगळता अद्यापही शांतताच आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार सद्यःस्थितीला नाही, तर पुणे महापालिकेत सेनेचे दहा नगरसेवक होते.

आंबोलीत झाड कोसळले; वाहतूक 2 तास ठप्प

कागदावर नसले तरी शिवसेनेचे अस्तित्व पुण्यात कायम आहे. मात्र, खडकवासलातील शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी सावंतांच्या घराबाहेर गुरुवारी केलेले आंदोलन आणि माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केलेले आंदोलन वगळता गेल्या चार दिवसांत पुण्यातील सेनेचे आजी-माजी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अद्यापही घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे पुण्यातील शिवसैनिक संभ्रमात आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रामुख्याने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक असलेले काही माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक पुण्यातही आहेत.

मात्र, थेट उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाऊन शिंदे यांच्या समवेत कोणी जाईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी अद्यापही बंडखोर आमदारांविरोधात एकही मोठे आंदोलन का झाले नाही, याचे उत्तर शिवसैनिकांकडे नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना शहरातील सेनेची ही अवस्था नक्की काय आहे, हे सांगणारे हे चित्र तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतो.

बंडखोर आमदार आणि भाजपविरोधात आंदोलन
पुणे शहर शिवसेनेचे अध्यक्ष संजय मोरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सुरुवातीला नक्की काय ते चित्र स्पष्ट होते. त्यातच पुण्यात दोन दिवस संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या होत्या, त्यामुळे शिवसैनिकांनी रस्त्यावर येणे टाळले. तसेच माझ्यासह अनेक पदाधिकारी मुंबईतही होते. आता मात्र बंडखोर आमदार आणि त्यांना पाठिंबा देणार्‍या भाजपच्या विरोधात मोठे जनआंदोलन केले जाणार आहे.’

हेही वाचा

सातारा : शिंगणापूर-म्हसवड मार्गावर बसचा दुष्काळ

सलतेवाडी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

सातारा : ठाकरे गटाच्या ‘अपात्र’ यादीत आ. महेश शिंदे

Back to top button