पिंपरी : सर्व्हर डाऊनमुळे 2200 दाखले पेंडींग | पुढारी

पिंपरी : सर्व्हर डाऊनमुळे 2200 दाखले पेंडींग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने सध्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक विविध दाखले मिळविण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची धावाधाव सुरू आहे. त्यातच महाऑनलाइनच्या प्रणालीत सर्व्हर डाऊनची समस्या वारंवार जाणवत आहे. त्यामुळे दाखल्यांचे काम संथ गतीने सुरू आहे.

पर्यायाने, गेल्या आठ ते दहा दिवसांत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयातंर्गत महा ई-सेवा आणि सेतू केंद्रातील 2 हजार दाखल्यांचे कामकाज पेंडींग पडले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल, नॉन क्रिमीलेअर, आर्थिक दुर्बल घटक, असे विविध प्रकारचे दाखले लागतात.

हे दाखले मिळविण्यासाठी सध्या पालक व विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. शहरामध्ये 95 महा ई-सेवा केंद्र आणि 1 नागरिक सुविधा केंद्र (सेतू केंद्र) आहे. या केंद्रांमध्ये विविध दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात सर्व प्रकारच्या 2200 दाखल्यांबाबत कामकाज प्रलंबित आहे. त्यामध्ये सर्वाधिक 1200 उत्पन्नाचे दाखले आहेत.

सर्व्हर डाऊनमुळे येणार्‍या अडचणी

5 ते 7 मिनिटात अपलोड होणार्‍या उत्पन्न दाखल्याला लागतोय अर्धा तास
दाखले कधी-कधी येतात ब्लँक त्यामुळे सर्व प्रक्रिया करावी लागते पुन्हा
एचएसएम प्रणालीद्वारे एका वेळी 1 ते 2 हजार दाखले देण्याच्या प्रक्रियेत अडथळे
दाखल्यांसाठी दिलेल्या मुदतीत नागरिकांना दाखले देणे बनले अवघड

नागरिक सुविधा केंद्रातील (प्राधिकरण) स्थिती

शैक्षणिक कारणासाठी आवश्यक दाखल्यांसाठी अर्ज : दररोज 170
सर्व्हर डाऊनमुळे दिवसभरात फक्त 40 अर्ज होतात अपलोड
5 मिनिटात होणार्‍या प्रतिज्ञापत्रासाठी लागतात 20 ते 25 मिनिटे

सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे सध्या दाखले देण्यास विलंब होत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत सर्व प्रकारचे 2200 दाखले प्रलंबित आहेत. सर्व्हर डाऊनची ही समस्या सुटावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.
– प्रवीण ढमाले, नायब तहसीलदार, पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय.

सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे 8 जूनपासून अर्ज अपलोड करणे, प्रतिज्ञापत्र बनविणे आणि दाखल्यांशी संबंधित प्रक्रियेला विलंब लागत आहे. काही वेळा दाखले कोरेच येतात. अशा वेळी ही सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागते.
– सोमनाथ घंटे, व्यवस्थापक, नागरिक सुविधा केंद्र, प्राधिकरण.

Back to top button