तीन हजार वाहनचालकांना अ‍ॅपचा दणका; वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई | पुढारी

तीन हजार वाहनचालकांना अ‍ॅपचा दणका; वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा: चालू वर्षातील सहा महिन्यांत (17 जूनपर्यंत) वाहतूक पोलिसांनी महाट्रॅफिक अ‍ॅप, टि्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून 3 हजार 246 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे फोटो नागरिकांनी अ‍ॅप, टि्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा आणि 500 रुपये मिळवा, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच केली आहे. त्यासाठी लवकरच कायदा आणण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यानंतर एखाद्या वाहनचालकाला एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला असेल तर त्यातील पाचशे रुपये फोटो पाठवणार्‍या व्यक्तीला दिले जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांच्या बाबातीत सजग राहणार्‍या नागरिकांना आता आर्थिक फायदादेखील होणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र प्रत्येक ठिकाणी कारवाईसाठी पोलिस असतीलच असे नाही. त्यामुळे सजग नागरिकांचा कारवाईत प्रभावी वापर करून घेण्यास वाहतूक पोलिसांनी अगोदरपासूनच सुरवात केली आहे.

शहरात वाहतुकीचे नियम मोडणार्‍या, तसेच गाड्या रस्त्यावर बेशिस्त पद्धतीने पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍यांचे फोटो मोबाईलद्वारे काढून पाठवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सजग नागरिकांनी तब्बल 3 हजार 246 वाहन चालकांवर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले. टि्वटर, महा ट्रॅफिक अ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांनी फोटो पाठवल्यानंतर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कारवाई झाल्याच्या मेसेजबरोबरच कोणत्या नियमांचे उल्लंघन केले याचा फोटो दंडाच्या पावतीबरोबर वाहनचालकाला मोबाईलवर प्राप्त होतो. त्यामुळे कारवाई झाल्याचे नाकारता येत नाही.
महा ट्रॅफिक अ‍ॅपवर अधिक फोटो (1 जानेवारी ते 17 जून)

अ‍ॅप                     आलेले फोटो
महा ट्रॅफिक अ‍ॅप       1408
टि्वटर                   1188
व्हॉट्सअ‍ॅपद्वारे           650

हेही वाचा

बेळगाव : ताळगाव येथील कारला निपाणीजवळ आग; तिघे वाचले

एमपीएससी करणार 800 पदांची भरती

साई रिसॉर्टप्रकरणात परब तिसर्‍या दिवशीही ईडीसोबत

Back to top button