पोलिस आयुक्तांनी आदेशाचा पुर्नविचार करावा; वाहतुक विभागाबाबत काढलेल्या आदेशाबाबत स्वयंसेवी संस्थांचे निवेदन | पुढारी

पोलिस आयुक्तांनी आदेशाचा पुर्नविचार करावा; वाहतुक विभागाबाबत काढलेल्या आदेशाबाबत स्वयंसेवी संस्थांचे निवेदन

पुणे : वाहतूक शिस्त राहावी आणि वाढावी, यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर होणाऱ्या कारवाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सीसीटीव्हीने  होणाऱ्या दंडाच्या वसुलीमधील त्रुटी दूर होण्यास बराच वेळ लागेल. त्यामुळे अशी कारवाई परिणामकारक होत नाही. पोलिसांच्या मनमानीबाबत तक्रारी असल्यास त्यांची पडताळणी करून त्या विशिष्ट पोलिसांवर कारवाई व्हावी, पण अशा प्रकारे पोलीस दलावर सरसकट शंका उपस्थित करणे हानिकारक असल्याचे निवेदन सेव्ह पुणे ट्राफिक मुव्हमेंट, परिसर आणि सीईई अशा संस्थानी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले. यावेळी त्यांनी आयुक्तांना आदेशाचा पुर्नविचार करावा असे अवाहन केले आहे.

वाहतूक पोलिसांनी कारवाईऐवजी वाहतूक नियमनाकडे लक्ष द्यावे अशा अर्थाचा आदेश पोलीस आयुक्तांनी नुकताच जारी केला आहे. कारवाई करताना वाहतूक पोलीस मनमानी करत असल्याच्या तक्रारींमुळे हे पाऊल उचलले गेले होते. त्याच पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्थांनी हे नुकतेच पोलिस आयुक्तांना हे निवेदन दिले आहे.

वाहतूक नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या लोकांवर लगेच कारवाई न करणे म्हणजेच त्यांना प्रोत्साहन दिल्या सारखे आहे. यामुळे अपघात घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील रस्ते अपघातातील मृत्यू 2021 मध्ये गेल्या 5 वर्षांमधील उच्चांकी पातळीवर पोचले असताना वाहतूक शिस्तीचे पाऊल मागे खेचणार्‍या अशा आदेशाबाबत स्वयंसेवी संस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

वाहतूक नियमनासाठी सिग्नल तसेच पाट्या लावल्या असताना पोलिसांनी नियमनाचे काम करणे हा जनतेच्या कराचा अपव्यय आहे. त्याबरोबरच वाहतूक कोंडीचे मुख्य कारण खाजगी वाहनांचा वाढता वापर हे असल्याने पोलिसांच्या नियमनामुळे कोंडी दूर होणेही अशक्य आहे. नियमभंग करणार्‍या पोलिसांचा वचक गरजेचा आहे. काही ठरावीक वाहतुक कर्मचार्‍यांसाठी सर्व वाहतुक विभागाला वेठीस धरणे देखील चुकीचे वाटते.
– राजेंद्र सिधये, संचालक, सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट

Back to top button