नारायणपूर : स्वच्छतेसाठी सासवडला दीडशे कर्मचारी | पुढारी

नारायणपूर : स्वच्छतेसाठी सासवडला दीडशे कर्मचारी

नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडमध्ये शुक्रवारी (दि. 24) मुक्कामी येणार आहे. शनिवारी (दि. 25) मुक्काम करून सोहळा रविवारी (दि. 26) पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यविषयक बाबींची तयारी पूर्ण केली आहे. सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी ही माहिती दिली.

नगरपालिकेने पालखी सोहळा काळात सासवड शहर आणि परिसरात कचरा संकलनासाठी 20 वाहने व 150 कर्मचारी नेमले आहेत. पालखी तळाची स्वच्छता, खांबावरील विजेचे दिवे, पालखी तंबूजवळ विजेची व्यवस्था जनरेटरसह केली आहे. तसेच हाय मास्ट, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पालखीतळावर महिलांसाठी व पुरुषांसाठी शौचालय व स्नानगृहे बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर पालखी तळाशेजारील जागेत तात्पुरत्या स्वरूपाचे फायबरचे महिला व पुरुषांसाठी 150 सीट्स शौचालयांची उभारणी केली आहे.

पालखीतळ परिसरात 10 ठिकाणी तात्पुरती कोंडाळी उभारण्यात आली आहेत. पाण्याचे टँकर भरून देण्याची व्यवस्था पाणीपुरवठा केंद्र, हिवरे रोड, वीर रोड, वढणे वस्ती व बोरावके मळा येथे करण्यात आली आहे. विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या काळात शहरात जादा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या वतीने रुग्णवाहिका व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांनी सांगितले.

नियंत्रण कक्षाची पालखीतळ, पाणीपुरवठा केंद्र व नगरपरिषद कार्यालय या ठिकाणी उभारणी करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या वतीने दिवे नाका येथे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येते. त्यासाठी तसेच पालखीला निरोप देण्यासाठी जेजुरी नाका येथे मंडप व स्पीकरची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मोरे यांनी दिली.

Back to top button