पालखीसाठी लोणी काळभोरची प्रशासकीय यंत्रणा सज्ज | पुढारी

पालखीसाठी लोणी काळभोरची प्रशासकीय यंत्रणा सज्ज

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणी काळभोरची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा ग्रामीण भागातील पहिला मुक्काम हा लोणी काळभोर येथे आहे. शुक्रवारी (दि. 24) गावातील विठ्ठल मंदिर येथे मुक्कामासाठी पालखी दाखल होत आहे. या सोहळ्याच्या स्वागत आणि मुक्कमाचे योग्य नियोजन केले आहे.

पोलिस यंत्रणेकडून पोलिस बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कवडीपाट ते खेडेकरमळा उरुळी कांचन या मार्गावर पालखी सोहळ्यासाठी अप्पर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी, होमगार्ड, एसआरपीएफ प्लाटून पथक, पोलिसमित्र असे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी शहर पोलिस विभागाकडून नियोजन करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग व लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कवडीपाट ते लोणी काळभोर ते खेडेकरमळा उरुळी कांचन परिसरातील हॉटेल, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण विहिरी, बोअरवेल, पाण्याचे स्रोत, पाण्याचे साठे यांची तपासणी करून पाण्याची नमुना चाचणी केली आहे. पालखी मार्गावर आरोग्य विभागाकडून वारकर्‍यांसाठी आरोग्य विभागाचे तीन टप्पे केले असून आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा आरोग्य सहायक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचार्‍यांची व्यवस्था केली आहे. वारकर्‍यांसाठी दोन खासगी रुग्णालयांत खास व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.

विश्वराज रुग्णालय, शिवम रुग्णालयात अतिदक्षता विभाग राखीव ठेवले आहेत; तर कार्डिक रुग्णवाहिका सेवेत असणार आहे, अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली. लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी दिवाबत्ती, आवश्यक त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आले आहेत. वारकरी मंडळींच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली आहे.

जागोजागी शौचालये, त्यासाठी पाण्याची व्यवस्था, असे नियोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात हगणदारीमुक्त सोहळा पार पाडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय फलक, पाण्यासाठी बोअरवेलची व्यवस्था उपलब्ध केली आहे. उघड्यावर घाण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत पथक वारकरी मंडळींना सहकार्य करून शौचालयाचा वापर करण्यासाठी मदत करणार आहे.

लोणी काळभोर येथे वारकर्‍यांसाठी तातडीच्या सेवेसाठी जागोजागी मार्गदर्शक फलक, त्यामध्ये आरोग्य विभाग, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत विभाग, रुग्णवाहिका यांचे फोन नंबर लावण्यात येणार असून, तसेच स्वच्छता मोहिमेचे फलक लावण्यात आले आहेत.
तसेच, वारकरी मंडळींच्या व दिंड्यांच्या मुक्कामासाठी तसेच जर पाऊस आला तर काही अडचण येऊ नये म्हणून गावातील सर्व शाळा, मंदिरे, समाजमंदिरे वारकर्‍यांसाठी खुली करण्यात आली आहेत.

या प्रकारे नियोजन लोणी काळभोर ग्रामपंचायत प्रशासनाने केल्याची माहिती लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, ग्रामविकास अधिकारी जे. एच. बोरावणे, उपसरपंच संगीता काळभोर यांनी दिली. मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी व दिंड्यांसाठी पुरवठा विभागाने लोणी काळभोर गावात शासकीय केरोसीन दुकानात वारकर्‍यांसाठी केरोसीनचे वितरण करण्यात येणार आहे. पाषाणकर गॅस एजन्सी येथे सिलिंडरचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी पुरवठा विभागाने कार्ड दिले आहे, अशी माहिती हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली.

Back to top button