चाकण :नाणेकरवाडीतील गोळीबार; सराईतावर गुन्हा दाखल | पुढारी

चाकण :नाणेकरवाडीतील गोळीबार; सराईतावर गुन्हा दाखल

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  चाकणजवळील नाणेकरवाडी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 20) सायंकाळी भरचौकात हवेत गोळीबार करण्यात आला. चाकण पोलिस ठाण्यात याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री ईश्वर ऊर्फ अक्षय पाटील (रा. नाणेकरवाडी, चाकण) या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार, अक्षय पाटील हा सोमवारी सायंकाळी नाणेकरवाडी येथे आला होता. जुन्या वादाच्या कारणावरून त्याने काही जणांशी वाद घातला. काही जणांवर हल्ला करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा पोलिसांचा कयास आहे. मात्र, येथील अन्य काही स्थानिकांनी हस्तक्षेप केल्याने चिडलेल्या अक्षय पाटील याने दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला.

त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले.
स्थानिकांकडे चौकशी केली. याबाबत पोलिस हवालदार सुपेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अक्षय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय पाटील याच्यावर यापूर्वी चाकण पोलिसांत अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button