पिंपरी : घेईन मी जन्म याजसाठी देवा, पुन्हा तुझी चरणसेवा साधावया, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरीत स्वागत | पुढारी

पिंपरी : घेईन मी जन्म याजसाठी देवा, पुन्हा तुझी चरणसेवा साधावया, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरीत स्वागत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाकाळात दोन वर्षानंतर संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार असल्याने दुपारी चार वाजल्यापासूनच शहरवासीयांचे डोळे पालखीच्या वाटेकडे लागले होते. पालखीचे आगमन झाल्यांनतर ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी व दर्शनासाठी शहरवासीयांना भक्ती-शक्ती चौकात गर्दी केली होती.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या वारकर्‍यांचा मेळा निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आल्यानंतर त्यांची सेवा करण्यास शहरवासी सरसावले. यावेळी भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाले. गळ्यात तुळशीच्या माळा आणि कपाळावर केशरीगंध लावलेल्या वारकर्‍यांच्या दिंड्या येताच आबालवृद्ध भाविकांचा उत्साह दुणावला. महापालिकेच्या स्वागत मंडपाजवळ पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती. प्रारंभी पालखीची आतुरतेने वाट पाहणार्‍या शहरवासीयांनी रांगोळीभोवती फुगड्या आणि फेर धरून सोहळ्याच्या वातावरणात रंगत आणली. यामध्ये विशेषत: महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सहभाग होता.

गळाभेट घेण्या भीमेची निघाली तुजा नामघोषात इंद्रायणी : माऊलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ

भक्तीगीतांवर ठेका धरणार्‍या महिला आणि पुरुषांच्या चेहर्‍यांवर आनंद ओसंडून वाहत होता. काही नागरिक डोक्यावर पांढरी टोपी, धोतर-सदरा आणि कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावून मोठ्या भक्तीभावाने सोहळ्यात सहभागी झाले होते. कुणी पावल्या खेळत होते, कुणी फुगड्या खेळत होते. निगडीतील भक्ती -शक्ती येथे पालखी मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच विठूरायाचा महिमा सांगणारी भक्ती, भावगीते सुरू होती.

यांनतर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण जवळ आला. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत सायंकाळी पाच वाजून 17 मिनिटांनी संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले. ज्ञानोबा-तुकाराम, असा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दणाणला. आषाढी वारीच्या निमित्ताने देहूतून जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी उद्योगनगरीत दाखल झाली. .

सर्व नागरिकांनी टाळ्या वाजवून पालखीचे स्वागत केले. एवढ्या प्रचंड गर्दीत देखील पालखीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्याची नागरिकांची लगबग सुरू होती. दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या उड्या पडू लागल्या. पालखी शहरात दाखल झाल्यानंतर पालखीच्या रथाचे सारथ्य आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

महाराष्ट्राची विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, संजय राऊत यांचे ट्विट

पालखी सोहळ्यात अतिरिक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. खांद्यावर भगव्या पताका आणि हरिनामाचा गजर करीत दिंड्या मार्गक्रमण करीत निगडीला पोहोचल्या. यंदा महापालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांना वस्तू देण्याऐवजी अग्निशमन यंत्रणा, औषधांसह वैद्यकीय पथक पंढरपूरपर्यंत देण्यात आले आहे.

अपंग विद्यालय निगडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिंडीचा सहभाग पालखी सोहळ्यात होता. सोहळ्यातील वारकर्‍यांची सेवा विविध संस्थांद्वारे सुरू होता.दरम्यान, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आकुर्डी येथे मुक्कामासाठी विसावला. कंट्रोल रूम देखील तयार करण्यात आली असून आपत्तीविषयी नियंत्रणाचे काम याद्वारे होणार आहे

Back to top button