साहेब! पोलिस चौकीतच मला बदडलं ओ... ! तरुणाची सहायक पोलिस आयुक्तांकडे धाव | पुढारी

साहेब! पोलिस चौकीतच मला बदडलं ओ... ! तरुणाची सहायक पोलिस आयुक्तांकडे धाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा:  ‘नातेवाईक असलेल्या एकाने माझ्या घरी येऊन माझ्या आई-वडिलांना दारू पिऊन शिवीगाळ केली. मी त्याला बोलावून विचारणा केली, त्याने माझ्याबरोबर वाद घातला. त्याची तक्रार मी पोलिस चौकीत केली. त्यावरून त्याने मला त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांच्या मदतीने पोलिस चौकीतच पोलिसांसमोर फरफटत नेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली…’ अशी कैफियत तरुण तक्रारदाराने सहायक पोलिस आयुक्तांकडे मांडलीे.

‘पोलिसांनी मला सोडविण्याचा व मारहाण करणार्‍यांना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर मी चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतरदेखील मारहाण करणार्‍या विरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी करीत बघ्याची भूमिका घेणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणाने सहायक पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

राजकीय आखाड्यासाठी सुरतच का?

सतीश बळीराम म्हस्के (रा. लोहगाव रोड, स्प्लेंडर काउंटी, वाघोली) असे मारहाण झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. सतीश म्हस्के गोवा येथे नोकरीस आहेत. त्यांचा नातेवाईक असलेल्या प्रसाद बामणे याने सतीश यांच्या आई-वडिलांना विनाकारण दारू पिऊन येऊन शिवीगाळ केली होती. यावर सतीश यांनी प्रसादला भेटण्यासाठी बोलवले असता, त्याने सतीश यांना शिवीगाळ केली.

तसेच ‘चंदननगरमध्ये भेट तुला मी मारतो,’ अशी धमकी दिली. अदखलपात्र तक्रार दिली होती. ही तक्रार 17 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता चंदननगर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या शिवराणा पोलिस चौकीत नोंदविली होती. त्यानंतर तासाभरात बामणे आणि त्याच्या साथीदारांनी सतीश यांना फरफटत नेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचा मोबाईल फोडून त्यांच्या हातातील अंगठीही काढून घेतली.

त्यानंतर सतीश यांनी त्यांच्याजवळील दुसर्‍या फोनवरून पत्नीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून घेतली व ससून रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार हवालदारासमोर घडत होता, तरी त्यांनी मदत केली नाही. त्याच दिवशीच्या पहाटे सतीश हे पत्नीसह तक्रार देण्यासाठी गेले. परंतु, त्यांची तक्रार नोंदवली नाही. याबाबत त्यांनी वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे निरीक्षक यांची भेट घेऊनही या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही.

केवळ तक्रार दिल्याच्या रागातून बामणेे आणि त्याच्या साथीदारांनी मला गंभीर मारहाण केली. या वेळी पोलिस उपस्थित असताना त्यांनी संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चंदननगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना द्यावेत.
– सतीश म्हस्के, तक्रारदार.

या प्रकरणात तक्रारदारांचा तक्रार अर्ज आमच्या कार्यालयाकडे आला आहे. या प्रकरणात वरिष्ठ निरीक्षकांना याबाबत कळविण्यात आले असून, तक्रार अर्जाची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
– किशोर जाधव, सहायक पोलिस आयुक्त

Back to top button