पिंपरी : संत तुकाराम महाराजांचा सोहळा, आकुर्डीत विसावला | पुढारी

पिंपरी : संत तुकाराम महाराजांचा सोहळा, आकुर्डीत विसावला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : 

घेईन मी जन्म याजसाठी देवा।
तुझी चरण सेवा साधावया॥

देहूतून मार्गस्थ झालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि.21) पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होताच अशीच काहीशी भावना शहरवासीयांमध्ये दाटून आली. पालखीतील पादुकांचे दर्शन अन् वैष्णवांच्या स्वागताचा उत्साह ओतप्रत भरून आला. सायंकाळच्या सुमारास हा सोहळा आकुर्डीत विसावला.

पंढरीच्या विठोबाला भेटण्यासाठी आतुर होऊन निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भक्ती-शक्ती चौक निगडी येथे सायंकाळी पाचच्या सुमारास आगमन झाले. ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात अवघा आसमंत न्हाऊन निघाला.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा होऊ शकला नव्हता. या वेळी कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आल्याने पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी झाले आहेत.

पखवाज, टाळ-मृदंगाचा गजर, फडकरी, चोपदार ज्ञानोबा-तुकारामचा गजर, वैष्णवांची मांदियाळी, फुगड्यांचा फेर…. शिस्तबद्ध नियोजन हे पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. निगडीतील अपंग विद्यालयाचे पथक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक पालखी मार्गावर स्वच्छता करताना दिसत होते. दोन वर्षानंतर वारी होत असल्याने हा सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी शहरवासीयांनी दुतर्फा एकच गर्दी केली होती. वारकर्‍यांचा हा मेळा कॅमेराबद्ध करण्याची लगबग दिसून येत होती. विशेष म्हणजे मोबाईल चार्जिंगसह चरणसेवेसाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला होता. जागोजागी प्रसाद वाटप करण्यात येत होते. वीणेकरी, वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, अन्नदान व्यवस्था, चरण सेवा, फुगड्यांचा खेळ हे सारे विलोभनीय दृश्य होते.

थकलेल्या पायांना विसावा देण्यासाठी वारकर्‍यांचा समूह ठिकठिकाणी बसून भजन-कीर्तनात रंगून गेला होता. मानाच्या दिंड्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होत्या. प्रचंड गर्दीतून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देत वारकर्‍यांनी याच शिस्तीचे दर्शन घडविले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर टाळांच्या गजरात पाय उंचावून वारकरी हरिनामात दंग झाले होते. देखण्या बैलांची फुलांनी सजवलेली गाडी पुढे गेल्यावर मानाचा अश्व आणि त्यामागे पाना-फुलांनी सजविलेला रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

रथातील पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी लोटत होती. भगव्या पताका, टाळकर्‍यांचा गजर यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते. अखेर सायंकाळी उशिरा पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात विसावली. वारी सोहळा दाखल झाल्यानंतर वारकर्‍यांची मुक्कामाची लगबग सुरू असताना परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. खेळणी, मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी झाली होती. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सोहळा दाखल होण्यापूर्वी परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते.

Back to top button