ओएलएक्सवर (OLX) मोटार खरेदीत बारामतीच्या एकाने घातला लाखोंना गंडा | पुढारी

ओएलएक्सवर (OLX) मोटार खरेदीत बारामतीच्या एकाने घातला लाखोंना गंडा

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : उंब्रज (ता. कराड, जि.सातारा) येथील एकाला ओएलएक्स (OLX) अॅपवरून जुनी कार खरेदी करणे चांगलेच महागात पडले. बारामतीतील तोतया पत्रकाराने कार खरेदीसाठी चार लाख रुपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात महेश मच्छिंद्र कदम व प्रियंका पांडूरंग जाधव (रा. एमआयडीसी, बारामती) यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव सदाशिव लाटे (रा. भवानीपेठ, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली. ५ ऑगस्ट रोजी फिर्यादीने ओएलएक्स (OLX) अॅपवर जुनी कार खरेदीसाठी जाहिरात पाहिली. त्यानुसार एक मोटार त्यांना पसंत पडली. दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क केला असता महेश कदम हे त्यांच्याशी बोलले. कदम यांनी स्वतः पत्रकार असल्याचे सांगितले. तुम्ही बारामतीत प्रत्यक्ष येवून मोटार पहा असे त्याने सांगितले.

बायकोला घेऊन येतो म्हणून गेला ते आलाच नाही…

त्यानुसार (दि. १३) आँगस्ट रोजी फिर्यादी विक्रांत, मित्र राजकुमार जाधव यांच्यासह बारामतीत आले. यावेळी कदम यांनी बारामती बसस्थानकासमोर त्यांची भेट घेत मोटार दाखवली. मोटारीतून शहरातून फेरफटका मारला.

मोटारीची कागदपत्रे पाहिली असता ती प्रियंका पांडूरंग जाधव (रा. वरलेगाव, ता. दक्षिण सोलापूर) या नावे दिसून आले. ती माझी पत्नी असून तिच्या लग्नापूर्वीच्या नावावर मोटार असल्याचे त्याने सांगितले. पाच लाख रुपयांत मोटारीचा व्यवहार ठरला.

त्यातील चार लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर एक लाख रुपये मोटारीची एनओसी ताब्यात मिळाल्यावर देण्याचे ठरले. त्यानुसार भिगवण रस्त्यावरील स्टेट बँकेतील शाखेतून जाधव यांच्या खात्यात फिर्यादीने चार लाख रुपये पाठवले.

नोटरी करण्यासाठी ते एका दुकानात थांबले असताना कदम हा घरी जावून पत्नीला घेवून येतो असे सांगून गेला.

तो परत आलाच नाही. त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधल्यावरही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.

हे ही पाहा :

Back to top button