पिंपरी : शहरात 90 टक्के नालेसफाई महापालिकेच्या अधिकार्‍यांचा दावा | पुढारी

पिंपरी : शहरात 90 टक्के नालेसफाई महापालिकेच्या अधिकार्‍यांचा दावा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील छोटे व मोठ्या नाल्यांच्या साफसफाईचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. बुधवार (दि.16) पर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे यंदा नाले तुंबून रस्त्यावर पाणी साचणार नसल्याचा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

शहरामधून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. या नद्यांना पावसाळ्यात पूर आल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते. तर पावसाचे प्रमाण वाढल्यास शहरातील सखल भागात पाणी साचते. नालेसफाई न झाल्यास या भागातील पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो. परिणामी, रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडीत भर पडते. नागरिकांच्या घरात तसेच, दुकानात पाणी शिरून पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो.

मिरज : अंमलीपदार्थ शोधक श्वान रेल्वे सुरक्षा दलात दाखल

पावसाळ्यात नागरिकांना या स्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सर्व नाल्यांची सफाई केली जाते. शहरात अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत तर काही नाल्यांवर भराव टाकून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी हे नाले अनैसर्गिक पद्धतीने वळवण्यात आले आहेत.

त्यामुळे या नाल्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. नाल्यामध्ये साचलेला गाळ, कचरा, झाडे-झुडपे, राडारोडा, अतिक्रमणांमुळे नाल्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. पालिका प्रशासनाने ते काम जलदगतीने व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक होते; मात्र अद्याप ती कामे सुरूच आहेत. शहरात एकूण 177 नाले असून, आतापर्यंत 90 टक्के काम झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.

बेळगाव : तिकिट वाटपातील गोंधळामुळे संक यांचा पराभव

काही नाल्यांच्याकडेला काढलेला कचरा व राडारोडा तसाच टाकून देण्यात आला आहे. त्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नाले सफाई योग्य पद्धतीने झाली नसल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी पावसाळी गटारे साफ करण्याचे काम अद्याप सुरूच आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचून नागरिक व वाहनचालकांची तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्व नाले 100 टक्के साफ करणार
शहरातील नाले साफसफाईचे काम क्षेत्रीय कार्यालयनिहाय सुरू आहे. त्यांचा नियमितपणे आढावा घेतला जात असून, अचानक पाहणी केली जात आहे. आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगात पूर्ण करण्यावर भर दिला आहे. सफाईसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार सुरू आहे, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

केवळ दिखाऊ साफसफाई
शहरात पावसाळी गटारे साफ करण्याचे काम उशिरा सुरू करण्यात आले आहे. गटारे तसेच पावसाळी गटारे साफ करण्याचे केवळ नाटक केले जात आहे. एका ठिकाणी आणि चेंबरभोवतीचा कचरा काढला जातो. मात्र, पाईपमधील कचरा व राडारोडा काढला जात नाही. तशी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. अर्धवट कामे करूनही ठेकेदाराची पूर्ण बिले तत्काळ काढली जातात. सफाईनंतर लोखंडी झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे यांनी सांगितले.

Back to top button