पुढे जाण्यासाठी विज्ञानाची गरज: शरद पवार | पुढारी

पुढे जाण्यासाठी विज्ञानाची गरज: शरद पवार

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती कृषी विज्ञान केंद्रात उभ्या राहिलेल्या सायन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण होईल, त्यांची विज्ञानाधिष्ठित भूमिका तयार करायला मदत होईल. जगातील कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर विज्ञानानेच ते शक्य होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. बारामती कृषी विज्ञान केंद्रात राज्य शासनाचे राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन व टाटा ट्रस्टच्या संयुक्तपणे उभारलेल्या सायन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अदानी फाउंडेशनचे प्रमुख उद्योजक गौतम अदानी, त्यांच्या पत्नी प्रिती अदानी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, तरुण शास्त्रज्ञ गोपालजी, विवेक सावंत, रयतचे चेअरमन अनिल पाटील, डॉ. सी. डी. माळी, सुप्रभाता चौधरी, आमदार रोहित पवार आदींची यावेळी उपस्थिती होती. पवार म्हणाले, की हे सेंटर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे आहे. विज्ञानासंबंधी त्यांच्यात आस्था निर्माण करणारा हा प्रकल्प अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने हाती घेत अल्पावधीत पूर्णत्वाला नेला. राज्यातील विद्यार्थ्यांनी येते भेट दिल्यावर त्यांच्या ज्ञानात, औत्सुक्यात भर पडेल.

जीवनात पुढे जायचे असेल तर विज्ञानवादी भूमिका स्वीकारावी लागेल. भाकड समजुती, खोटेपणाने मन तयार होत नाही. विज्ञानावर आधारित ज्ञान मिळविले तरच जीवनात यश मिळू शकेल. मनुष्य विज्ञानाच्या बदलामुळेच चंद्र, मंगळावर जाऊ शकला. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीची अत्यंत गरज आहे. तो पाया या केंद्राच्या माध्यमातून मजबूत होईल. खासदार सुळे, सारंग साठे यांचेही यावेळी भाषण झाले. प्रास्ताविकात संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सेंटर उभारणीमागील भूमिका स्पष्ट केली.

वास्को, दाबोळीत ई-श्रम कार्डचे वाटप

प्रत्येक जिल्ह्यात सेंटर व्हावे

काकोडकर म्हणाले, की आजचे जग हे इनोव्हेशनचे आहे. ही वृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये बिंबविण्यासाठी हे सेंटर महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. राज्यात पाच सेंटर असून हे सहावे सेंटर उभे राहिले आहे. विज्ञानवादी विद्यार्थी तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका सेंटरची गरज आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियमने सायन्स ऑन व्हील ही संकल्पना राबवत बसमध्ये प्रयोगशाळा उभारत ती विद्यार्थ्यांपर्यंत नेली. काही बस या सेंटरला मिळाल्या तर हे काम अधिक जोमाने होईल. आज केवळ पदवीला महत्त्व उरलेले नाही. पदवी घेतली तरी तेवढ्या नोकर्‍या उपलब्ध नाहीत. त्यामुळे कल्पकतेतून उद्योग उभे करावे लागतील, तरच देश पुढे जाईल.

जिल्हावार सेंटरसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की राज्यात सध्या सहा विभागांमध्ये सेंटर कार्यरत आहेत. काकोडकर यांनी मागणी केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात सेंटर उभे राहण्यासाठी पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. आनंददायी शिक्षणात आपला देश मागे आहे. परदेशात कौशल्याधिष्ठित, नावीन्यपूर्ण शिक्षण दिले जाते, आपल्याला त्या दिशेने जावे लागेल.

हेही वाचा

बोरी : तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पादन वाढवा

सातारा : भाविकांची संख्या विचारात घेऊनच सुविधांचे नियोजन : पालकमंत्री

सांगली : शिक्षण समितीच्या मनमानीमुळे संघात प्रवेश

Back to top button