ऑनलाइन जुगाराची तरुणाईमध्ये क्रेझ; झटपट श्रीमंत होण्याचा तरुणाईला लागला रोग | पुढारी

ऑनलाइन जुगाराची तरुणाईमध्ये क्रेझ; झटपट श्रीमंत होण्याचा तरुणाईला लागला रोग

अनिल सावळे पाटील

जळोची : अत्याधुनिक युगात मोबाईलसारख्या साधनांचा वापर करून तरुणाई झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे. असे असताना पालक व पोलिस यंत्रणा यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, तर नक्कीच ऑनलाइन जुगार व इतर गोष्टींना आळा बसेल व तरुणाई याकडे जाणार नाही.

ऑनलाइन गेमद्वारे जुगाराचे प्रमाण वाढले असून यामध्ये रमी, जुआरी पार्किंग, बार क्रिकेट ड्रीम, शेअर ड्रीम आदी 11 ते 12 प्रकार ऑनलाइन गेम खेळले जातात. यामध्ये ज्याच्या हातात स्मार्ट फोन ते सहज खेळतात. शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण व नोकरीच्या शोधार्थ असणारे तरुण-तरुणी यांची संख्या यामध्ये जास्त आहे.

मिश्रपद्धतीच्या शिक्षणाची नव्या पिढीला गरज; डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे प्रतिपादन

पाल्य ऑनलाइन अभ्यास करतात की जुगार खेळतात, हेसुद्धा पालकांना कळू शकत नाही. यामधील बरेच ऑनलाइन गेम रात्री दहा वाजेनंतर सर्रास खेळले जातात. मोबाईल जुगार हा नवा प्रकार गंभीर आहे. मुलांचे जुगार खेळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या खेळण्यामुळे वेळ व पैसा जात आहे. गेल्या काही महिन्यांत जुगार खेळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन जुगाराचे प्रमाण 80 टक्के वाढले. अनेक जण व्यसनी झाले आहेत.

ऑनलाइन गेम खेळण्याची कारणे

यशस्वी व झटपट श्रीमंत होण्यासाठी सोपा मार्ग, सहजरीत्या दिलेल्या लिंकच्या आधारे जॉईन होता येते किंवा अ‍ॅप डाऊनलोड केल्यास खेळता येते, मित्र किंवा या क्षेत्रातील लोक सहज व मोफत खेळण्यासाठी मार्गदर्शन करतात.

कारवाई होणे गरजेचे

‘झटपट श्रीमंत व्हा’ यासारख्या जाहिरातीवर निर्बंध हवेत, जामीनपात्र गुन्हा असल्याने जुगारी व जुगार चालविणारे पुन्हा या व्यवसायात येतात. जुगार कायद्यात काही बदल करण्याची गरज असून, अशा चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

मुसेवाला हत्या : संतोष जाधवचे कॅनडातील गँगस्टर गोल्डीशीही कनेक्शन

तरुण-तरुणी बक्षिसाच्या आमिषाला बळी पडतात. त्यामुळे जुगार खेळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मुलांना डोळे, कानाचे आजार होऊ लागले आहेत. मोठी रक्कम हरल्यास हृदयविकारासारखे आजार होतात, त्याचबरोबर वेळ व पैसा जात असून, मुले कायमस्वरूपी व्यसनी बनण्याचा धोका जास्त आहे.
– महेश कदम, अध्यक्ष, पालक संघटना, पुणे जिल्हा

जुगार खेळण्याच्या नव्या पद्धती हा गुन्हाच आहे. नागरिकांनी जागरूक राहून आपल्या आसपास असे खेळणारे किंवा ऑनलाइन जुगारचालक आढळल्यास तक्रारी नोंदविल्यास तत्काळ कठोर कारवाई करू. पालकांनी आपल्या पाल्याचे मोबाईलदेखील तपासावेत.
– महेश ढवाण, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे

Back to top button