पाय पुन्हा वळले केंद्रांकडे; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा नागरिकांना धसका | पुढारी

पाय पुन्हा वळले केंद्रांकडे; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा नागरिकांना धसका

समीर सय्यद

पुणे : शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत आहे. त्यामुळे लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांचे पाय आता लसीकरण केंद्रांकडे वळत असल्याचे गेल्या दोन आठवड्यांची आकडेवारी पाहिल्यास दिसून येते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या सुमारे साडेसहा लाख नागरिकांनी दुसर्‍या डोसकडे पाठ फिरवली.

त्यातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस घेणे आवश्यक असून, नागरिकांनी शिल्लक असलेली लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ग्रामीण भागात ’हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात येत असून, 773 टीम सर्वेक्षण करत आहेत. दुसर्‍या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन लस दिली जात आहे.

सोलापूर : एमआयएमचा निषेध मोर्चा

जुलैअखेरपर्यंत दुसर्‍या डोससाठी शिल्लक असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 14 दिवसांत एक लाख अकरा हजार जणांनी लस घेतली आहे. दोन आठवड्यात झालेल्या लसीकरणाचा विचार केल्यास तुलनेत 11 हजारांनी लसीकरण वाढले. 27 मे ते 2 जून दरम्यान, जिल्ह्यात पहिला डोस 3 हजार 423, दुसरा डोस 25 हजार 391, दक्षता (प्रिकॉशन) डोस 21 हजार 291 अशा एकूण 50 हजार 105 जणांनी लस घेतली आहे. तर 3 ते 9 जून दरम्यान 61 हजार 422 जणांचे लसीकरण झाले. त्यात पहिला डोस 5 हजार 704, दुसरा डोस 23 हजार 474 आणि दक्षता (प्रिकॉशन) डोस 32 हजार 244 जणांनी घेतला आहे.

सरासरी रोज आठ हजार लसीकरण

गेल्या दोन आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, दुसरीकडे नागरिकाचा ओढा लसीकरण केंद्रांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 14 दिवसांची सरासरी पाहिल्यास 7 हजार 966 जणांनी दररोज लस घेतली आहे. शेवट्याच्या चार दिवसांत सरासरी दहा हजारांहून अधिक नागरिकांनी लस घेतली.

इतिहासकारांनी मुघलांना जास्त महत्त्व दिले : गृहमंत्री अमित शहा

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे

क्षेत्र             शासकीय         खासगी     एकूण
पुणे ग्रामीण      560               65        625
पुणे शहर        388              795      1183
पिं.चिं. मनपा    272              156       428
 1220            1016      2236

लसींचा शिल्लक साठा

कोविशिल्ड – 117450
कोव्हॅक्सिन – 43810
कोर्बेव्हॅक्स – 148240

जिल्ह्यात 222 कोरोना रुग्ण आढळले

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, शुक्रवारी 222 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 88 जण कोरोनामुक्त झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारावर पोहोचली आहे. पुणे शहरात 137 , पिंपरी-चिंचवडमध्ये 50, ग्रामीण भागात 28 आणि कॅन्टोमेंन्ट भागात आठ रुग्णांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. 88 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 18 वर पोहोचली आहे. त्यातील 993 रुग्ण घरातच विलगीकरणात असून, 25 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दिवसभरात 2 हजार 699 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

Back to top button