पदवीसाठी यंदा चुरस; 1,16,768 विद्यार्थी शर्यतीत | पुढारी

पदवीसाठी यंदा चुरस; 1,16,768 विद्यार्थी शर्यतीत

पुणे : शहरातील नामांकित विद्यालयांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच तत्काळ पदवी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या वर्षी 1 लाख 18 हजार 680 विद्यार्थी शर्यतीत होते, तर यंदा 1 लाख 16 हजार 768 विद्यार्थी प्रवेशाच्या शर्यतीत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी यंदाही उशिरा आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे.

पदवी प्रवेशाविषयी प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयांमध्ये आता प्रवेशप्रक्रिया, समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होईल. पुण्याबाहेरून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे गुणांच्या आधारे प्रवेशासाठी चुरस होणार आहे. पुणे परिसरातील महाविद्यालयांची माहिती घेऊन प्रवेशासाठी प्रयत्न केल्यास सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल. बारावीनंतर सर्वच विद्या शाखांमध्ये विविध नवे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, आजही वाणिज्य प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा असते. त्याचबरोबर सनदी अधिकारी होण्यासाठी पाया पक्का व्हावा, यासाठी अनेक विद्यार्थी कला शाखेला प्रवेश घेतात. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) अभियांत्रिकी प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) जुलैमध्ये होणार आहे.

तर, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुकला अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) द्यावी लागते. ही सीईटी ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. या दोन्ही परीक्षा होऊन निकाल जाहीर झाल्यावर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे यंदा पदवी प्रवेशासाठी चुरस राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवसभर नोकरी करून मिळवले बारावीत यश

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या वेबसाईटवर ठेवावे लक्ष

शहरातील सर्व नामांकित महाविद्यालयांनी पदवी प्रवेशासाठी त्यांच्या वेबसाईट विकसित केलेल्या आहेत. या वेबसाईटवरूनच विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येतात. तसेच वेबसाईटवरच विद्यार्थ्यांची मेरीट लिस्ट लावली जाते. आणि विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयांच्या वेबसाईटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. फर्ग्युसन महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, बीएमसीसी, एमएमसीसी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच पार पडणार आहे.

हम भी किसी से कम नहीं

बारावीच्या निकालात सामान्य मुलांची टक्केवारी 93.29 टक्के आहे. तर मुलींची टक्केवारी 95.35 टक्के आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी मात्र सामान्य मुलांपेक्षा वरचढ कामगिरी करत जवळपास मुलींएवढी 95.24 टक्केवारी मिळवली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी ‘हम भी किसी से कम नहीं’ असा संदेश दिला आहे. या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व सोयीसुविधा दिल्या होत्या, अशी माहिती मंडळाने दिली.

यंदा परीक्षेसाठी एकूण 6 हजार 333 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 301 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. यातील 6 हजार 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांचे प्रमाण 95.24 टक्के आहे. दरम्यान, या निकालातदेखील मुलींनी बाजी मारली असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 96.15 टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण 94.75 टक्के आहे, अशी माहिती मंडळाने दिली आहे. सर्वाधिक 1 हजार 547 विद्यार्थ्यांनी लोकोमोटर डिसॅबिलिटी प्रवर्गातून परीक्षेसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी 1 हजार 471 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जखमी माकडीण उपचारासाठी स्वतःच पोहोचली दवाखान्यात

या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 95.52 आहे. त्यानंतर ब्लाइंडनेस गटातून 1 हजार 136 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी 1 हजार 66 उत्तीर्ण झाले. हे प्रमाण 94.76 टक्के आहे. हिअरिंग इंपेरमेंट गटातून 899 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी 867 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण 96.66 टक्के आहे. मंडळाने विद्यार्थ्यांची एकूण 22 दिव्यांग प्रकारच्या गटात परीक्षा घेतली.

यातील 6 प्रकारातील निकाल 100 टक्के लागला आहे.तर 10 प्रकारातील विद्यार्थ्यांचा निकाल 95 टक्के लागला.
पुण्यातील अनेक महाविद्यालयांनी बारावीच्या गुणांवर मेरीटच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून मेरीट फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झाली असून पुढील 10 दिवसांमध्ये त्यांची मेरीट लिस्ट लावण्यात येईल.

बारावीच्या गुणांच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल.

– डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

Back to top button