चार महिने गर्भवती राहू नका! 'झिका' प्रतिबंधासाठी बेलसरमध्ये जनजागृती | पुढारी

चार महिने गर्भवती राहू नका! 'झिका' प्रतिबंधासाठी बेलसरमध्ये जनजागृती

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: ‘झिका’ विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या बेलसर (ता. पुरंदर, जि. पुणे) व परिसरातील गावात पुढील चार महिने महिला गर्भवती राहणार नाही, यासाठी प्रजननक्षम जोडप्यांमध्ये याविषयी जनजागृती करण्यात आली. ‘झिका’ प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात आल्याचे पुरंदर तालुक्याच्या आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले.

झिका विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाच्या रक्तात किमान दोन आठवडे हे विषाणू राहतात.

तर पुरुषांच्या वीर्यात हे विषाणू चार महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतात. अशा विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात प्रजननक्षम जोडप्यांचे संबध येऊन महिला गर्भवती राहिल्यास त्या महिलेला होणाऱ्या बाळाच्या मेंदूची वाढ पूर्ण होत नाही.

मेंदूचा आकार कमी होतो, बाळाला व्यंगत्व येऊ शकते अथवा उपजत मृत्यू होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तसेच आरोग्याची काळजी आणि सतर्कता म्हणून ही जनजागृती करण्यात येत असल्याचे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे २९ जुलै रोजी राज्यातील पहिला ‘झिका’ विषाणूचा प्रादुर्भाव झालेला एक महिला रुग्ण आढळून आली होती.

झिकाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी बेलसर व पाच गावात युद्धपातळीवर उपयायोजना राबवून परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य पथक, राज्याचे आरोग्य पथक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार यासाठी गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

याबाबत डॉ. उज्वला जाधव यांनी सांगितले की, गर्भवती महिलेच्या जन्मलेल्या बाळाच्या मेंदूची पूर्ण वाढ होत नाही, डोक्याचा आकार कमी होतो, वेळेच्या आधी संबधित महिला बाळंत होवू शकते, तसेच उपजत बाळाचा मृत्यू देखील होवू शकतो.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी व सतर्कता म्हणून पुढील चार महिन्याच्या काळात बेलसर व परिसरात महिला गर्भवती राहणार नाही, यासाठी प्रजननक्षम जोडप्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

या जोडप्यांना गर्भप्रतिबंधक साधनांचे वाटप करण्यात आले असल्याचे डॉ. उज्वला जाधव यांनी सांगितले.

बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र व बेलसर ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक त्या उपयायोजना सुरु असल्याचे डॉ. भरतकुमार शितोळे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button