तिसरा बुस्टर डोस घ्यावा लागेल; पुनावालांचे वक्तव्य | पुढारी

तिसरा बुस्टर डोस घ्यावा लागेल; पुनावालांचे वक्तव्य

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दोन डोस घेऊनही सहा महिन्यांनंतरही शरीरातील अँडीबॉडी कमी होताहेत. त्यामुळे तिसरा बुस्टर डोस घ्यावाच लागेल. मी तिसरा बुस्टर डोस घेतला आहे, अशी माहिती सायरस पुनावाला यांनी दिली. ते लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

पुण्यात लशीचे उत्पादन होऊनही पुण्याला पुरवठा कमी आहे. याबाबत विचारले असता पुनावाला म्हणाले.

‘आम्ही मोदी सरकारला म्हटलं की पुण्यात जास्त लस द्या. पण, मोदी सरकार त्यांच्या मनाने करतं. लशीची उपलब्धता नाही.

म्हणून मोदी सरकारने दुसऱ्या लशीचे अंतर वाढवले, अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली.

तिसऱ्या लाटेबाबत पुनावाला म्हणाले, तिसरी लाट कडक नसेल. कारण हार्ड इम्युनीटीमुळे अनेकांना बाधा होणार नाही.

आगामी येऊ घातलेली नोवोवॅक्स लस चांगली आहे. अमेरिकेत त्या कंपनीला लायसन्स मिळेल तेव्हा आम्हाला मिळेल.

आम्हाला लायसन्स मिळालं की ती बाजारात येईल.’

…पण मृत्यूदर खूप असेल

लॉकडाऊन बाबत ते म्हणाले, ‘लॉकडाऊन व्हायला हवा. लॉकडाऊन नाही केला तर लोकांना हार्ड ईम्युनिटी मिळेल. पण, मृत्यू दर खूप असेल.

म्हणून तर लॉकडाऊन योग्य आहे. जे लोक गेले ते निष्काळजीपणामुळे गेले आहेत. अनेक अंधश्रद्धामुळे सुद्धा लोक गेले आहेत.’

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रणाबाबत ते म्हणाले, लसीचा मिक्स डोस घेण्याची गरज नाही. ते मिक्स केलं तर दोन्ही लसींमुळे प्रभाव कमी होईल.

Back to top button