भाजप पुण्यात बहुमतापासून दूर? पक्षांतर्गत सर्व्हेचा निष्कर्ष, नेत्यांत घबराट | पुढारी

भाजप पुण्यात बहुमतापासून दूर? पक्षांतर्गत सर्व्हेचा निष्कर्ष, नेत्यांत घबराट

पुणे ; ज्ञानेश्वर बिजले : पुणे महापालिकेत पाच वर्षे सत्ता राबविल्यानंतर, आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता (भाजप) पक्षाने केलेल्या सर्व्हेमध्ये पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नसल्याचा निष्कर्ष निघाला. त्यामुळे पक्षनेत्यांत एकच खळबळ उडाली. त्यात सुधारणा करण्यासाठी पक्षबांधणीबरोबरच नाराजांची समजूत घालत पक्ष मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

भाजपची पक्षांतर्गत निर्णय प्रक्रिया गेल्या दशकात पूर्णपणे बदलली आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आठ वर्षांपूर्वी पक्षाची सूत्रे आल्यानंतर, पक्षाने त्रयस्थ यंत्रणेमार्फत सर्व्हे करण्याचे धोरण आखले. त्याच्या आधारे त्या मतदारसंघातील विषय, उमेदवार ठरविण्यावर त्यांनी भर दिला. भाजपने विधानसभेच्या गेल्या दोन्ही निवडणुकीतही याच धोरणाचा अवलंब केला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात गेल्या वेळी महापालिका निवडणुकीसाठी तोच मार्ग स्विकारला.

खासगी संस्थेमार्फत दोन-तीन सर्व्हे केले जातात. पक्षांतर्गत माहितीही गोळा करून अंदाज बांधला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फेही अंदाज वर्तविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असते. या सर्व माहितीच्या आधारे निष्कर्ष काढून निर्णय घेण्यावर पक्षातर्फे भर दिला जातो.

भाजपला 80 जागा

भाजपने त्याच पद्धतीने नुकताच एक सर्व्हे केला. त्यात भाजपला पुणे महापालिकेत जास्तीत जास्त 75 ते 80 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आल्याचे पक्षाच्या वरीष्ठ वर्तुळातील सूत्रांनी सांगितले. गेल्यावेळी भाजपच्या बाजूने अनुकूल वातावरण होते.

त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या जवळपास चौपटीने वाढून 97 झाली होती. अनेक वर्षानंतर महापालिकेत एका पक्षाला एकहाती सत्ता मिळाली होती. त्यात मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचाही वाटा होता. महापालिकेत यापूर्वी अकरा आणि आता नवीन 23 गावे समाविष्ट झाली आहेत.

तेथील लोकसंख्येनुसार नगरसेवकांच्या संख्येत चारने भर पडेल. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत 166 नगरसेवक निवडून येतील. बहुमतासाठी 84 नगरसेवकांची आवश्यकता आहे. पहिल्या सर्व्हेत भाजप बहुमतापासून थोडासा दूर आहे. बहुमतापेक्षाही कमी नगरसेवक निवडून येण्याची शक्यता लक्षात येताच भाजप नेतृत्व खडबडून जागे झाले.

फडणवीस यांचे लक्ष

देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांनी पक्षाच्या पुर्नबांधणीवर लक्ष केंद्रीत केले. सर्व्हेत दिसून आलेले बदललेले चित्र ध्यानात घेत भाजपला व्यूहरचना करावी लागणार आहे. बदलत्या वातावरणात नवे चेहरे मैदानात उतरवावे लागतील. गेल्या वेळी अनेकजण लाटेत निवडून आले होते. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम न केलेल्या अनेक नगरसेवकांची गच्छंती होण्याची शक्यता पक्षांतर्गत वर्तुळात व्यक्त केली जात आहे. सर्व्हेत आलेले निष्कर्ष त्यासाठी आधार ठरतील. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांत घबराटीचे वातावरण आहे, तर इच्छुक कार्यकर्ते वार्ड बांधणीला लागले आहेत.

प्रभाग एकचा की दोनचा

महापालिकेचा प्रभाग एक नगरसेवकाचा की दोन नगरसेवकांचा यांवर अद्यापही अंतीम निर्णय झालेला नाही. त्यातच प्रशासन नवीन प्रभाग रचनेला लवकरच प्रारंभ करीत आहे. कायद्यानुसार सध्या एक नगरसेवकाचा वॉर्ड याप्रमाणे रचना करण्यात येईल. दोन नगरसेवकांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने केल्यास, त्याप्रमाणे फेररचना होईल. हे लक्षात घेतल्यास शहरातील अनेक भागात समीकरणे बदलतील.

स्थानिक पातळीवरील स्पर्धा

एक किंवा दोन नगरसेवकांचे प्रभाग झाल्यास त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरील तगडे कार्यकर्ते निवडणुकीत उतरतील. अशा बहुरंगी लढतीमध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल नोंदविले जाण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास, किरकोळ मताधिक्यांनी काही प्रभागाचे निकाल लागतील. त्यात निवडून येणाऱ्या अपक्षांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सर्वांचीच दोन्ही आघाडीची स्पर्धा लागेल. त्यामुळे बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांचाच प्रयत्न राहील.

भाजप स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील झाला आहे. सध्यातरी भाजपमध्ये येण्यास अन्य पक्षातील फारसे कार्यकर्ते इच्छुक असल्याचे दिसून येत नाही. भाजपमध्ये गेल्या निवडणुकीत अन्य पक्षातून आलेले व नगरसेवक झालेले पुन्हा स्वघरी परतू नयेत, यासाठीही भाजपला तटबंदी बळकट करावी लागेल. हे सर्व लक्षात घेत भाजप त्यांची रणनीती आखू लागला आहे.

स्वतःच्या ताकदीवर बहुमत मिळविण्यासाठी भाजपचे नेतृत्व पहिल्या सर्व्हेतील निरीक्षणावर अभ्यास करू लागला आहे. पहिल्या सर्व्हेत भाजप बहुमतापासून आठ-दहा जागांनीच दूर आहे. या सर्व्हेत आढळून आलेल्या पक्षातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न ते करतील. त्यामुळेच फडणवीस यांनी पुण्यातील सूत्रे हाती घेतली आहे. स्थानिक नेत्यांच्या मदतीने रणनिती आखून महापालिकेची सत्ता राखण्यासाठी भाजपच्या नेत्यांनीही कंबर कसली आहे. येथून पुढील सहा महिन्याचा काळ त्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड

नगरसेवकांनी पाच वर्षांत केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड त्यांना दाखविले जाईल. त्यात सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. अहवाल खराब असलेल्या काहीजणांना पुढील निवडणुकीत वगळले जाईल. प्रभाग रचना करण्याची संधी गेल्या वेळी भाजपला होती, आता ती सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहेत. त्यामुळे, प्रभागरचना कशी होते, त्याकडेही भाजपचे लक्ष लागून राहिले आहे. दुसऱ्या सर्व्हेची तयारी त्यांनी सुरू केली आहे. बदललेल्या वातावरणात दोन-तीन सर्व्हे केल्यानंतर संभाव्य उमेदवारांची नावे ठरविण्याकडे भाजपचे धुरीण लक्ष घालतील.

Back to top button