पुणेः दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी कापला गळा | पुढारी

पुणेः दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी कापला गळा

पुणेः पुढारी वृत्तसेवा

दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी एकाचा चाकूने गळा कापून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.24) सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास जुन्या जिल्हा परिषदेसमोरील सार्वजनिक मुतारीच्या समोर फुटपाथवर उघडकीस आली होती. याप्रकरणी सहा तासांच्या आत समर्थ पोलिसांनी खुनाचा छडा लावत प्रभातकुमार कमलाकर म्हस्के (वय 36, रा. सोलापूर), नीलेश बाळासाहेब भोसले (वय 25, रा, वेल्हे, शिवापूर) या दोघांना अटक केली आहे.

प्रभातकुमार याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत, तर संजय असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुनील रणदिवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय, नीलेश व प्रभातकुमार हे तिघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तिघे मिळेल ती कामे करून फुटपाथवर राहतात. सोमवारी प्रभातकुमार याला केटरिंगच्या कामाचे 1600 रुपये मिळाले होते.

तिघांनी एकत्र येऊन रात्री दहा वाजता मद्यप्राशन केले. संजय याने पुन्हा दारू पाजण्याचा आग्रह केल्यामुळे परत मद्यप्राशन केले. त्यानंतर तिघे रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. संजय याने प्रभातकुमार याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, पैसे संपल्यामुळे त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेेळी त्यांच्यात वाद झाले. त्यातून दोघांनी संजय याचा गळा आंबा कापण्याच्या छोट्या चाकूने कापला. खून केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. खून झालेला व्यक्ती अज्ञात होता.

पोलिसांसमोर मृत व्यक्तीची ओळख पटविण्याबरोबरच आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान होते. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, मृत व्यक्ती व दोघे आरोपी एकत्र जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक संदीप जोरे, कर्मचारी सुशील लोणकर, संतोष काळे, नीलेश साबळे, हेमंत पेरणे यांच्या पथकाने दोघांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी चाकूने गळा कापून खून केल्याची माहिती दिली.

हेही वाचा

Back to top button