बँक खातेदाराचे लॉकर परस्पर उघडून दोन कोटी 65 लाख रुपयांचे सोने-हिर्याचे दागिने, 9 लाख 50 हजारांची रोकड, असा 2 कोटी 78 लाखांचा ऐवज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकरमधील दागिन्यांसह रोकड तसेच महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेऊन अपहार केल्याची तक्रार खातेदाराने दिली आहे. याप्रकरणी लष्कर भागातील एका बँकेच्या महिला व्यवस्थापकासह सराफी पेढीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर बँकेच्या ब्रांच मॅनेजर सीताराम बडेजा यांनीसुद्धा लॉकर उघडण्याचा प्रत्यन केला. मात्र, ते उघडले गेले नाही. यानंतर फिर्यादी यांना सांगण्यात आले की, ज्या कंपनीने लॉकर बनविले आहे, त्यांना बोलावून लॉकर उघडण्यात येईल. यासाठी 3 ते 4 चार दिवस लागतील. मात्र, त्याच दिवशी बँक व्यवस्थापकाकडून फिर्यादी यांना बोलावून घेण्यात आले आणि सांगण्यात आले की, त्याच बँकेचे दुसरे ग्राहक सुरेंदर शहानी यांनी त्यांचे लॉकर समजून फिर्यादी यांचे लॉकर उघडले आणि त्यातील दागिने, रोख रक्कम, हिरे असा एकूण 2 कोटी 78 लाख 6 हजार 701 रुपयांचा मौल्यवान ऐवज व इतर महत्त्वाची कागदपत्रे बँकेच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता स्वत:हून काढून घेतली. पुढे सुरेंदर शहानी यांनी ज्वेलर सतीश पंजाबी यास दागिने दिले व त्याने कोणतीही शहानिशा न करता सदर सर्व दागिने पुरावा नष्ट करण्यासाठी वितळून टाकले.
याबाबत यश केशवलाल कपूर (वय 46, रा.सोपानबाग, घोरपडी) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापक नयना अजवानी, सुरेंदर शहानी तसेच सराफी पेढीचे मालक सतीश पंजाबी यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत अरोरा टॉवर्स-कॅम्प येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कपूर हे एका फूड्स कंपनीत जनरल मॅनेजरपदी नोकरी करतात. त्यांचे वडील केशवराव कपूर यांनी अरोरा टॉवर येथील पंजाब नॅशनल बँकेत लॉकर घेतले होते. त्यांच्या मृत्यूनंतर ते लॉकर फिर्यादींच्या आईकडे आले. पुढे आईच्या मृत्यूनंतर ते लॉकर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीकडे हस्तांतरित झाले. दरम्यान, कपूर यांनी दोन महिन्यांपूर्वी लॉकर उघडून तपासणी केली तेव्हा लॉकरमध्ये हिरेजडीत दागिने, रोकड सुस्थितीत होती. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी फिर्यादी कपूर यांनी बँकेत जाऊन लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला असता ते उघडत नव्हते.
बँकेने नियमांचे पालन न करता लॉकर उघडले. लॉकरमधील दोन कोटी 65 लाख रुपयांचे दागिने सराफ सतीश पंजाबीला दिले. पंजाबीने दागिने परस्पर वितळवले. पुरावा नष्ट करण्यासाठी दागिने वितळवण्यात आल्याचे कपूर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडल दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी बँकेला भेट दिली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलिस निरीक्षक विशाल दांडगे तपास करीत आहेत.
एका व्यक्तीच्या बँकेतील लॉकरमधून 2 कोटी 78 लाख रुपयांचा ऐवज चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बँक व्यवस्थापक यांच्यासह तिघे आणि इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
गिरीश दिघावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे