महाळुंगे पडवळ : पुढारी वृत्तसेवा
आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे दोन बिबट्यानी मंगळवारी (दि.२४) पहाटे एक शेळी ठार केली असून दोन लहान शेळ्या (करडे) व एक कालवड जखमी केली. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी कळंब ग्रामस्थांनी केली आहे. कळंब-शिरामळा येथे शेतकरी बाळू नारायण भालेराव यांच्या गोठ्यात दोन बिबट्यानी गोठ्याची जाळी तोडून एक शेळी ठार केली असून शेजारी बांधलेल्या दोन लहान शेळ्या व एक कालवड जखमी केली आहे.
सचिन भालेराव यांनी वनविभागाला बिबट्याच्या हल्ल्याची माहिती दिली. वनविभागाचे वनरक्षक कैलास दाभाडे व वनमजूर कोंडीभाऊ डोके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत दोन दिवसापूर्वी कळंब सोसायटीचे सचिव शंकर भालेराव यांनाही भर दुपारी उसाच्या शेतात बिबट्याने दर्शन दिले आहे.
ऊस तोडणीमुळे बिबट्यांची लपण जागा कमी झाल्याने भक्ष्य शोधण्यासाठी बिबटे सैरभैर झाले आहेत. हे बिबटे माणसांवर हल्ले करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. महावितरण कंपनीने बिबट्या प्रवण क्षेत्रात कृषी पंपासाठी अखंडितपणे दिवसभर लाईट द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे