शिरूर: भरोसा सेल धावली अन् पोलिसांनी रोखला बालविवाह... | पुढारी

शिरूर: भरोसा सेल धावली अन् पोलिसांनी रोखला बालविवाह...

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा

शिरूर तालुक्यातील एका गावात होत असलेला बालविवाह भरोसा सेल आणि स्थानिक पोलिसांनी वेळेत रोखला. दोन्ही परिवारांचे प्रबोधन केले. त्यानंतर कुटुंबांनीही मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होण्यास काही महिने बाकी असून, ती पूर्ण झाल्यानंतरच विवाह करू, असा निर्णय घेतला. आधुनिक काळात बहुतांश पालकांचा कल मुला-मुलींना उच्च शिक्षण देण्याकडे असल्याने बालविवाह समस्या आता उरली नाही, अशीच अनेकांची समज आहे. त्यामुळे यावर फारशी चर्चाही होत नाही.

मात्र, हा प्रकार पूर्णपणे थांबला आहे, असे म्हणताही येत नाही. शिक्षण, आरोग्याचे सार्वत्रिकीकरण व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी बालविवाह थांबविणे खूप महत्त्वाचे आहे. ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका यांच्याबरोबरच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलिस पाटील यांनीही याबाबत जबाबदारी घ्यायला हवी. याबाबत प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घेतली तर बालविवाह नक्की थांबतील. परिसरातील राजकीय नेत्यांची मूकसंमती असल्याशिवाय कोणताही पालक असे धाडस करीत नाही, हेच अनेक घटनांतून पुढे आले आहे.

विवाहापूर्वी परवानगी घ्या

बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने यापुढच्या काळात विवाहापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयास कळवावे व परवानगी घेऊन विवाह निश्चित करावा, असे मत टाकळी हाजी येथील पोलिस पाटील शोभाताई मंदिलकर यांनी व्यक्त केले.

बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कुटुंबातील सदस्यांवर कडक कारवाई केली जाईल.

                         – राजेंद्र खराडे, ग्रामविकास अधिकारी, टाकळी हाजी

हेही वाचा :

 

 

Back to top button