मान्सून आज अरबी समुद्रात धडकणार! | पुढारी

मान्सून आज अरबी समुद्रात धडकणार!

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : मान्सून अत्यंत वेगाने दक्षिण अरबी समुद्राकडे येत असून, तो शनिवारी 21 मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी बंगालच्या उपसागरातील म्यानमार बेटांजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नव्या चक्रीवादळाची शक्यता आहे.

मान्सूनने बंगालच्या उपसागरासह अंदमान बेट व्यापून अरबी समुद्राच्या दिशेने कूच केले. आगामी बारा ते पंधरा तासांत तो अरबी समुद्राकडे धडकणार आहे. मान्सूनची आगेकूच सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी म्यानमारजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नव्या चक्रीवादळाच्या निर्मितीची शक्यता आहे. मात्र, हा पट्टा बारा तासांत शमण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस ओसरला असून, 24 मेपर्यंत काही भागांत हलका पाऊस होईल, असा अंदाज आहे. गेल्या चोवीस तासांत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. मात्र, राज्यात इतरत्र हवेचा दाब कमी असल्याने पावसाचा जोर शनिवारपासून ओसरत आहे. राज्याच्या कमाल तापमानात शुक्रवारी अचानक मोठी घट झाली असून, बहुतांश शहरांचे कमाल तापमान 35 ते 37 अंशांखाली आले होते.

Back to top button