शिवसेनेचे एकला चलो रे | पुढारी

शिवसेनेचे एकला चलो रे

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : शिवसेनेने पुण्यात सध्या तरी ‘एकला चलो रे’ हीच भूमिका घेतली आहे. स्वबळ वाढविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुण्यातील सर्व जागा लढविण्याची तयारी शिवसैनिकांनी सुरू केली आहे. पक्षाने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर सोपविली आहे. राऊत यांच्यासोबत सचिन अहिर आणि आदित्य शिरोडकर आहेत. शिरोडकरांनी प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आढावा घेतला. अहिरदेखील वारंवार दोन्ही शहरांना भेटी देत शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. गेले वर्षभर हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू असल्याने शिवसेनेला त्यांच्या, तसेच विरोधी पक्षांच्या प्रभागनिहाय ताकदीचा नेमका अंदाज आला आहे.

खटाव : धारपुडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

शिवसेनेची बांधणी
नव्या-जुन्या स्थानिक नेत्यांच्या साह्याने शिवसेनेची पुनर्बांधणी गेल्या वर्षी झाली. शाखाप्रमुखांपर्यंत नियुक्ती करून संभाव्य उमेदवारांवर लक्ष देतानाच मतदार यादीच्या छाननीलाही त्यांनी प्रारंभ केला. प्रत्येक तीन विधानसभा मतदारसंघांसाठी एक शहरप्रमुख नियुक्त केला. पुण्यातील आठ मतदारसंघांसाठी चार शहरप्रमुख निवडले गेले. त्यांच्यावर संभाव्य उमेदवार निश्चितीची जबाबदारी सोपविली.

मिशन 40
शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत दहा नगरसेवक निवडून आले. ती संख्या वाढवित 40 वर नेण्याचे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. मिशन 40 च्या उद्दिष्टपूर्तीसाठी 80 जागांवर लक्ष केंद्रित केले. विद्यमान नगरसेवकांना त्यांच्यासोबत एकाला निवडून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. महापालिकेतील भाजपच्या कारभारातील चुका सांगतानाच, राज्य सरकारने केलेल्या चांगल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. पुण्यात शिवसेनेची कोथरूड, येरवडा, कोंढवा, हडपसर, शहराचा मध्यवर्ती भाग, खडकवासला, धायरी या भागात ताकद आहे. पक्षाचे अस्तित्व आठही मतदारसंघांत आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या निवडून आलेल्या दहा नगरसेवकांपैकी येरवड्यातून तिघे, हडपसरमधून दोघे, शहराच्या पूर्व भागातील पेठांतून दोघे, तर कोथरूड, कोंढवा व बिबवेवाडीतून प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

सहकार प्राधिकरण होणार डिजिटाईज

आघाडी होणार का?
राज्यात महाविकास आघाडी असून, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे पुण्यात आघाडीसाठी राष्ट्रवादीने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे. स्थानिक नेते जरी अनौपचारिकरीत्या आघाडीबाबत बोलत असले, तरी शिवसेनेने दोन पक्षांत आघाडी केल्यास 173 पैकी किमान 80 जागांची अपेक्षा केली आहे. तिन्ही पक्षांची आघाडी झाल्यास काँग्रेस व शिवसेनेला मिळून किमान शंभर जागांची अपेक्षा आहे. सध्या मात्र राष्ट्रवादीचे नेते आघाडीची भाषा करीत असले, तरी स्वतःकडे अपेक्षेपेक्षा अधिक जागा घेत आहेत. त्यातच शिवसेना व राष्ट्रवादी यांची हडपसर व खडकवासला मतदारसंघांत अनेक प्रभागात ताकद असल्याने तेथे जागा वाटपात वाद होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांच्या मते शिवसेना व काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यास जागावाटपात दोघांनाही पन्नास टक्के जागा मिळू शकतील. काँग्रेसची ताकद शहराच्या मध्यवर्ती भागात जास्त आहे, तर शिवसेनेचा विस्तार उपनगरात आहे. त्यामुळे दोघांमध्ये सामंजस्याने जागावाटप होऊ शकते. सध्या तरी महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. चर्चा झाली व जागावाटपात कमी जागा मिळण्याची शक्यता असल्यास शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू झाली आहे. आघाडीचा निर्णय मुख्यत्वे मुंबईत आघाडी होणार की नाही, त्यावर अवलंबून असल्याचे स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे संख्याबळ
वर्ष                           नगरसेवक
1992                            5
1997                           21
2007                          20
2012                          15
2017                          10

आघाडी करण्याची राष्ट्रवादीची सध्या मानसिकता दिसत नाही. त्यामुळे शिवसेना व काँग्रेसची आघाडी करावी, असे माझे मत मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. दोघांचेही प्रत्येकी दहा नगरसेवक होते. त्यामुळे जागा वाटप समसमान करता येईल. दोन्ही पक्षांची ताकद वेगवेगळ्या भागात असल्याने, ती परस्परपूरक ठरेल.
                                                      – विशाल धनवडे, माजी नगरसेवक.

कोणत्याही पक्षासोबत आमची आघाडीबाबत बोलणी झालेली नाहीत. पुण्यात सर्व जागा लढविण्याची आमची तयारी सुरू झाली आहे. 26 ते 30 मेदरम्यान शिवसंपर्क अभियान राबविणार आहोत.
                                                       – संजय मोरे, शिवसेना शहरप्रमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 मे रोजीच्या मुंबईतील सभेत स्वबळ वाढविण्याची सूचना केली. सध्या तरी ‘एकला चलो रे’ हीच भूमिका आहे. आघाडी झाल्यास किमान निम्म्या जागा शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत. महाआघाडी झाल्यास त्या तुलनेत जागा मिळाव्यात. मात्र, पुण्याचा महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही एवढ्या जागा आम्ही जिंकू.
                                                     – गजानन थरकुडे, शिवसेना शहरप्रमुख

पक्षाने प्रभागात काम करण्यास सांगितले असून, मतदार याद्या तपासून घेणे, त्यानुसार बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, ही कामे आम्ही सुरू केली आहेत. मुख्यत्वे प्रभागपातळीवर पक्ष बळकट करण्याकडे आमची नजर आहे.
                                                            – पल्लवी जावळे, माजी नगरसेविका

हेही वाचा :

Back to top button