सारसबागेजवळ होणार ‘टुरिस्ट डेपो’, धावणार ई – बस | पुढारी

सारसबागेजवळ होणार ‘टुरिस्ट डेपो’, धावणार ई - बस

प्रसाद जगताप
पुणे : शहरातील प्रसिद्ध सारसबागेजवळच पीएमपी प्रशासन आता नवा ‘टुरिस्ट डेपो’ साकारणार आहे. या डेपोतून थेट सिंहगडावर नव्याने ताफ्यात दाखल होणार्‍या 7 मीटर लांबीच्या गाड्या सुटतील. त्यामुळे आगामी काळात खासगी वाहनांसाठी किल्ल्यावर पुन्हा बंदी झाली, तरी पुणेकरांना थेट पुण्यातूनच ई-बस मिळू शकेल.
सिंहगडावर पीएमपी प्रशासनाने नुकत्याच ई-बस सुरू केल्या होत्या. मात्र, त्यांची अपुरी संख्या आणि अरुंद घाट रस्त्यावर या गाड्या व्यवस्थित बसत नसल्यामुळे ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. आगामी काळात सिंहगडावर जाणारी ही ई-बस सेवा नियोजनबद्ध, सुविधापूर्ण आणि सुरक्षित प्रवास देणारी असेल, असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.
चार्जिंग स्टेशन उभारणार…
सारसबागेलगतच असलेल्या जुन्या पीएमपी डेपोलाच पीएमपी आता टुरिस्ट डेपो म्हणून साकारणार आहे. येथून फक्त नव्या येणार्‍या व आकाराने लहान असलेल्या ई-बस सुटणार आहेत. या बससाठी पीएमपी येथे चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.
नव्या 300 गाड्या होणार दाखल
महापालिकेच्या सहायाने पीएमपी प्रशासन आता नव्या 7 मीटर लांबीच्या 300 ई-बस घेणार आहे. या सर्व बस नव्या टुरिस्ट डेपोतून थेट सिंहगडावर सेवा पुरवतील.
सिंहगडावर सुरू केलेल्या ई-बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येथे सेवा पुरविताना काही समस्या आल्या. मात्र, त्यांचे लवकरच निराकरण करण्यात येणार आहे; तसेच सारसबाग येथे नवा ‘टुरिस्ट डेपो’ साकारला जाणार असून, येथून थेट नव्या 7 मीटर लांबीच्या ई-बस सिंहगडावर सेवा पुरवतील.
                                                                                                             – लक्ष्मीनारायण मिश्रा,
                                                                                       अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
सारसबागेजवळील जुन्या पीएमपी डेपोच्या जागेवर पीएमपी ‘टुरिस्ट ई-बस डेपो’ साकारणार आहे.

Back to top button