कोर्‍हाळ्यात झिरो बजेट शेतीचा प्रयोग यशस्वी | पुढारी

कोर्‍हाळ्यात झिरो बजेट शेतीचा प्रयोग यशस्वी

वडगाव निंबाळकर : पुढारी वृत्तसेवा
कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील शेतकरी दिलीप रामचंद्र गुरव यांनी रासायनिक खते, औषधांचा मारा न करता नैसर्गिक पद्धतीने चवळीचे पीक घेत भरघोस उत्पादन मिळविले. पारंपरिक पिकांना फाटा देत चवळीची लागवड केली. झिरो बजेट शेतीचा प्रयोग यशस्वी केला. मुबलक पाणी असणार्‍या या भागात शेतकरी ऊस, कांद्याच्या पुढे जायला तयार नाही. अल्पभूधारक शेतकरी दिलीप गुरव यांनी मात्र नैसर्गिक शेती करत फक्त 50 गुंठे शेतजमिनीत नेहमी वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयोग करून अधिक उत्पन्न घेतले.
सध्या या क्षेत्रावर त्यांनी चवळीचे पीक घेतले आहे. दोन महिन्यात चवळीची वाढ होत ती तोडण्यायोग्य झाली. शेतीतील उत्पादन खर्च कमी करून अधिकचे उत्पन्न मिळवता येवू शकते, हे गुरव यांनी दाखवून दिले आहे. चवळीच्या वेलांचे मांडव तयार करून त्याला काठीने आधार दिला. या मांडवाच्या तारेवरून पाण्यासाठी ठिबकची पाईप टाकत फ्रॉगर पद्धतीने पिकांना पाणी देण्याची व्यवस्था केली. यात पाऊस पडल्याप्रमाणे वेलींवर पाणी पडत राहते. तसेच तापमान योग्य ठेवण्यास मदत होते.
चवळी तारेच्या मांडवावर गेली असल्याने शेंगा खूपच लांब आणि पाऊस पडल्याप्रमाणे पाणी मिळत असल्याने पीक तजेलदार दिसत आहे. यासाठी त्यांनी चिमूठभरसुद्धा रासायनिक खत वापरले नाही. फक्त पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले. सध्या या क्षेत्रातून रोज 250 किलो शेंगा विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. सध्याच्या बाजारभावानुसार पाच ते सहा हजार रुपये त्यासाठी मिळत आहेत.
हेही वाचा:

Back to top button