बारामती : मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील पती- पत्नी ठार  | पुढारी

बारामती : मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील पती- पत्नी ठार 

बारामती; पुढारी वृत्तसेवा : मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती- पत्नी ठार झाल्याची घटना बारामती – जेजुरी मार्गावर आंबी येथे रविवारी (दि. १५) सकाळी अकराच्या सुमारास घडली. बाळासो मारुती कोलते (वय ४७) व कविता बाळासो कोलते (वय ३८, रा. पिसर्वे, ता. पुरंदर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दतात्रेय गजानन साळुंके (रा. वीर, ता. पुरंदर) या मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी योगेश दत्तात्रय कोलते यांनी फिर्याद दिली. आंबी येथे सागर राजेंद्र गायकवाड यांच्या दुकानाजवळ ही घटना घडली.

साळुंके हे त्यांच्या ताब्यातील वॅगनार मोटार (एमएच 12, टीवाय 3322) चालवत होते. तर कोलते पती- पत्नी दुचाकीवरुन (एमएच १२. बीएल २००९) वरुन जात होते. साळुंके यांनी त्यांच्या ताब्यातील मोटार हयगयीने अविचाराने चालवत समोरुन आलेल्या दुचाकीला धडक दिली. त्यात कोलते पती- पत्नी ठार झाले.

दुचाकीने उडवल्याने पादचारी ठार

बारामती- मोरगाव रस्त्यावर क-हावागज गावच्या हद्दीत रविवारी झालेल्या अपघातात मोहन लष्कर या पादचा-याचा मृत्यू झाला. लष्कर हे त्यांच्या घराजवळ रस्ता ओलांडून पलिकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना उडवत तीस फूट अंतरापर्यंत दुचाकीच्या पुढून फरफटत नेले. या अपघाताचा थरार लगतच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

जेजुरी रस्ता ठरला घातक

बारामती- जेजुरी रस्त्यावर रविवारी दोन अपघातात तिघांना जीव गमवावा लागला. हा रस्ता गुळगुळीत झाला असला तरी रस्त्यावरील अपघातांची मालिका संपत नाही. गत आठवड्यात याच रस्त्यावर मेडदजवळ अपघात घडला होता.

Back to top button