अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे लवकरच येणार - पुढारी

अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे लवकरच येणार

पुणे, पुढारी ऑनलाईन: आपल्या गाण्यांमुळे आणि सडेताेड  वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या अमृता फडणवीस यांचे आता नवे गाणे येणार आहे. अमृता फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या असता त्यांना माध्यमांना ही माहिती दिली.

यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. पुण्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरून त्यांनी सरकारवर टीका केली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. तर ११ जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरासह जिल्ह्याचाही समावेश असल्यामुळे निर्बंध कायम आहेत.

‘सरकारने मुंबईतील निर्बंध शिथिल केलेले असताना पुण्यात का कायम ठेवले?’ असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी सरकारला विचारला. तसेच पुणेकरांनी धरणे आंदोलन करण्याचा सल्लाही दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. एका कंपनीच्या महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आले होते.

फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. त्यांनी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

‘पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्क्यांवर असूनही येथे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मॉल्स आणि इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना चारपर्यंतची वेळ पुरेशी नाही. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे.

वेळ अधिकची देण्यात आली असती, तर नागरिकांनी गर्दी केली नसती. नागरिकांनी नियमांचे पालन करुन खरेदी करावी.

मुंबईत डेथ रेट अधिक असतानाही तिथे सर्व व्यवहार खुले केले जात आहेत.

तिथे एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? प्रशासन जागे होत नसेल तर नागरिकांनी धरणं आंदोलन करण्याची आवश्यकता आहे.

तसेच एक धोरण तयार करून आता पुण्यात अधिक मोकळीक देण्याची वेळ आलेली आहे.’

गणेशोत्सवाआधी येणार गाणं

फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गाण्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, माझे गाणे लवकरच येणार असून गणेशोत्सवापूर्वी ते तुम्हाला ऐकायला मिळेल.

यावेळी प्रतिनिधींनी त्यांना गाणे सादर करण्याचा आग्रह केला असता, ‘मी स्टेजवर असते तर तिथे म्हटले असते. इथं सादर करण्याची ही वेळ नाही.

तुम्ही मला सिरीयस प्रश्न विचारता आहात. पुढील वेळी हलके फुलके प्रश्न विचाराल, तेव्हा बघू… पुढच्या वेळी १०० टक्के नक्की गाणं म्हणेन.’

पहा व्हिडिओ: शिवचरित्र आजही आवश्यक

Back to top button