पुणे : प्रेयसीच्या मुलाचे अपहरण; प्रियकराला बेड्या | पुढारी

पुणे : प्रेयसीच्या मुलाचे अपहरण; प्रियकराला बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रेयसीच्या दीड वर्षीय मुलाचे अपहरण करून फरार झालेल्या प्रियकाराला बारा तासात सहकारनगर पोलिसांनी लातूर येथून बेड्या ठोकल्या. सुनील सोपान पांढरे (वय.26,रा. गंगाखेड,जि.परभणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून अपह्रत मुलाची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. ही घटना मंगळवारी (दि.3) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय महिला व सुनीलल पांढरे या दोघांत प्रेमसंबंध आहेत. आठ वर्षापुर्वी बारामीत येथे एका कंपनीत एकत्र काम करत असताना, दोघांचा परिचय झाला होता. 1 ते 3 एप्रिल या कालावधीत दोघे पुणे सातारा-रोडवरील एक लॉजमध्ये एकत्र वास्तव्यास होते. यावेळी फिर्यादी महिलेचा दीड वर्षाचा मुलगा त्यांच्या सोबत होता. दरम्यानच्या काळात दोघांत वाद झाले. त्यातूनच पांढरे याने मंगळवारी सकाळी फिर्यादी महिलेला लॉजमधील बाथरुमध्ये कोंडले. त्यानंतर त्यांच्या दीड वर्षीय मुलाला घेऊन तेथून पळ काढला होता. महिलेने आरडा-ओरडा केला तेव्हा मॅनेजरने खोलीकडे धाव घेतली. तेथून सुटका झाल्यानंतर तिने सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

गुन्हा दाखल करून पोलिसांनी तांत्रिकविश्लेषनाद्वारे आरोपीचा माग काढण्यास सुरूवात केली. पांढरे याने त्याचा मोबाईल देखील बंद केला होता. तो बसने प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बसमधील एका व्यक्तीचा संपर्क क्रमांक मिळवून त्याला ट्रेस करण्यास सुरूवात केली. मंगळवारी पहाटे तीन साडे तीनच्या सुमारास तो एक लॉजमधून बाहेर पडताना पोलिसांनी त्याला पकडून मुलाची सुखरुप सुटका केली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे, कर्मचारी बापू खुटवड, महेश मंडलीक, भुजंग इंगळे, महादेव नाळे, सुशांत फरांदे, सागर सुटकर, सागर शिंदे, प्रदीप बेडीसकर यांनी केली.

Back to top button