१८ जिल्ह्यांत एक थेंबही पाऊस नाही, मान्सूनपूर्व पावसात मोठी घट | पुढारी

१८ जिल्ह्यांत एक थेंबही पाऊस नाही, मान्सूनपूर्व पावसात मोठी घट

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : यंदा मान्सूनपूर्व पावसात प्रचंड मोठी घट झाली असून, गेल्या पाच वर्षांतला हा नीचांकी पाऊस असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 1 मार्च ते 27 एप्रिल 2022 या साठ दिवसांत राज्यातील 36 पैकी तब्बल 18 जिल्ह्यांत एक थेंबही पाऊस नाही. तेथे उणे 100 टक्के पावसाची नोंद झाली आहे. याचा परिणाम यंदाच्या पूर्व मशागतीच्या कामावर होण्याची शक्यता आहे. तसेच जमिनीतील पाणी पातळीतही मोठी घट होण्याची ही चिन्हे आहेत.

गेली काही वर्षे मार्च ते मे या कालावधीत मान्सूनपूर्व पाऊस भरपूर झाल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे. राज्यात सरासरी 60 टक्के पाऊस होतोच, मात्र यंदा प्रथमच तो उणे 89 टक्क्यांवर गेल्याने चिंता वाढली आहे. या पावसाने जमिनीतील पाणी पातळी चांगली राहते त्यामुळे धूप कमी होऊन झाडे जगतात. मात्र, यंदा 1 मार्च ते 27 एप्रिल या 58 दिवसांच्या कालावधीत राज्यातील 18 जिल्ह्यांत एक थेंबही पाऊस झाला नाही, हे यंदाच्या उन्हाळ्याचे वैशिष्ट्य आहे. मात्र, धरणात अजून 55 टक्क्यांवर पाणी असल्याने दुष्काळी स्थिती नाही.
(राखाडी रंगात दाखवलेल्या 18 जिल्ह्यांत एकही थेंब पाऊस नाही. पिवळ्या रंगात दाखवलेल्या जिल्ह्यात खूप कमी पाऊस. लाल रंगात अत्यल्प पावसाचे जिल्हे. हिरव्या रंगात साधारण पावसाचे जिल्हे. आकाशी रंगात मुसळधार पावसाचे जिल्हे,
तर गडद निळ्या रंगात अतिवृष्टीचे जिल्हे दिसत आहेत.)

* या जिल्ह्यांत पाऊसच नाही (18 जिल्हे, उणे 100%)
यंदा मार्च ते एप्रिल अखेर पालघर, ठाणे, नंदुरबार, बुलढाणा, जालना, बीड, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊसच पडला नाही.

*  खूप कमी पाऊस.. (3 जिल्हे, उणे 60 ते उणे 99%)
मुंबई (उणे 100%), रायगड (उणे 83%), सातारा (उणे 86%), नगर (उणे 77%), उस्मानाबाद (उणे 87%)

* रेड झोनमधील जिल्हे
(उणे 20 ते उणे 59%)
रत्नागिरी (उणे 33%), पुणे (उणे 46%), सोलापूर (उणे 43%)

* साधारण पाऊस (19 ते उणे 19%), औरंगाबाद (11%), सांगली (3%)
अतिवृष्टीचे जिल्हे (60% पुढे), कोल्हापूर (109%), सिंधुदुर्ग (344%), मुसळधार पाऊस (20 ते 59%), धुळे (57%), जळगाव (27%)

कमी पावसाचा परिणाम मोसमीपूर्व मशागतीवर होऊ शकतो. कारण या पावसाचा पेरणीच्या आधी उपयोग होतो. 1972 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता, तेव्हा अशीच स्थितो होती. मे महिन्यात जर पाऊस पडला तरच हे संकट टळू शकते. कारण पाऊस पडला नाही, तर जमिनीतील बाष्प कमी होते व मशागतीच्या कामांवर परिणाम होतो.
डॉ. रामचंद्र साबळे,
ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ

Back to top button