यकृताची ‘सूज’ वाढलीय!; हा आहे बदलत्या जीवनशैलीचा परिणाम

ज्ञानेश्वर भोंडे
पुणे : अतिरिक्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, उशिरा जेवणे, व्यायामाचा अभाव आणि अल्कोहोलचे सेवन यामुळे फॅटी लिव्हर (यकृतावरील सूज) असणार्या व्यक्तींची संख्या वेगाने वाढत आहे. हे टाळण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे, असे मत यकृत विकार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरवर्षी 19 एप्रिल हा जागतिक यकृत दिन म्हणून पाळला जातो. देशात दरवर्षी 1 लाखाहून अधिक लोकांचा फॅटी लिव्हर आजारामुळे मृत्यू होतो. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर त्याची लक्षणे ओळखणे अत्यंत कठीण असते ही गोष्ट अधिकच भयंकर आहे. यकृताकडे भरपूर राखीव क्षमता असते. त्यामुळे जोपर्यंत त्याची खूप जास्त प्रमाणात हानी होत नाही तोपर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. म्हणून हा आजार शेवटच्या टप्प्यातच कळतो. वेळेत केलेल्या चाचण्यामुळे ही समस्या ओळखण्यास मदत होऊ शकते.
केंद्राकडून सुरक्षा पुरविणं हे राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण : दिलीप वळसे-पाटील
अल्कोहोलचे अतिसेवन धोकादायक
अल्कोहोलच्या चयापचयाच्या कार्यात यकृत हे प्रामुख्याने सहभागी असते. अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीराला मिळणार्या अतिरिक्त कॅलरीजमुळे यकृताच्या अंतर्भागात चरबी साठली जाऊ लागते. त्यामुळे यकृताला इजा पोहोचू शकते किंवा त्याला सूज येऊ शकते. याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असे म्हणतात.
राजकीय दंगलींमुळे भारताचा श्रीलंका होण्यास वेळ लागणार नाही : संजय राऊत
अल्कोहोलमुळे यकृतामध्ये चरबी साठणे हा अल्कोहोलिक फॅटी लिव्हर या आजाराचा एक भाग आहे, ज्यातून यकृताची आणखी हानी होऊ शकते. अल्कोहोलचे फारसे सेवन केले जात नसूनही यकृताच्या उतींमध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याच्या स्थितीला नॉन- अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर असे म्हणतात.
– डॉ. हर्षल राजेकर, सल्लागार, हेपॅटोबिलरी शल्यचिकित्सक
ज्यांचे यकृत कमकुवत झाले आहे, त्यांची रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमकुवत होऊ शकते. यकृताच्या आजाराच्या तीव—तेनुसार उपचार उपलब्ध आहेत. या उपचारांमध्ये औषधे, प्रतिबंधित आहार किंवा शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. यकृताचे नुकसान झाल्यास यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.
– डॉ. क्षितीज कोठारी, सल्लागार, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी
कोल्हापूर : समुद्री उष्ण लहरी वाढल्या; मान्सूनवर प्रतिकूल परिणाम
या उपाययोजना करा…
- वजन नियंत्रणात ठेवा, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) योग्य असल्यास यकृतामध्ये चरबी साठणे टाळता येते.
- दर दिवशी किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करा.
- उच्च कॅलरीयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले, कर्बोदकांचे जास्त प्रमाण असलेले पदार्थ हे फॅटी लिव्हरसाठी आमंत्रण देतात.
- फळे, सॅलड्सारख्या भरपूर फायबर असलेल्या, जीवनसत्वे, सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध पदार्थांमुळे फॅटी लिव्हरपासून संरक्षण मिळते.
- उशिरा जेवल्याने आपले शरीर कॅलरीज साठवून ठेवत असते. त्यामुळे लवकर जेवण करावे.
- भरपूर पाणी प्या.
- मद्यपान टाळा, फॅटी लिव्हर असलेल्यांनी अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे थांबवायला हवे.
- नियमित आरोग्य तपासणी करा.