पुणे : पैलवान बांदलची धांदल सुरूच; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले गहाण खत - पुढारी

पुणे : पैलवान बांदलची धांदल सुरूच; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले गहाण खत

पुणे पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती तथा पैलवान मंगलदास बांदल याच्यासह पाच जणांच्या विरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदल याच्यावर शहर व ग्रामिण पोलिस ठाण्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याचा मुक्काम येरवडा कारागृहात आहे.

बांदल याने एका शेतकर्‍याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले. त्यानंतर परस्पर 6 कोटी 75 लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये शिवाजीराव भोसले बँकेतील एका अधिकार्‍याचा देखील समावेश आहे.

मंगलदास बांदल, संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध 342, 384, 385, 386, 387, 34 सह आर्म अ‍ॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वढु खुर्द, ता. हवेली येथील 74 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार वढु खुर्द येथे 2013 मध्ये व त्यानंतर वेळोवेळी घडला आहे. दरम्यान आरोपी बांदल याचे राजकिय लोकांशी असलेले संबंध व त्यातून कुटूंबियांना होणारा त्रास या भितीपोटी त्यांनी आत्तापर्यंत तक्रार दिली नव्हती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची हवेली तालुक्यात गट क्र. 153/1 मध्ये 3 हेक्टर 71 आर जमीन आहे. बांदल व इतरांनी फिर्यादी यांना चारचाकी गाडीमध्ये डांबून ठेवून दमदाटी करुन व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले. त्यानंतर त्यांच्या परस्पर 6 कोटी 75 लाख रुपये काढून घेतले.

या जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली. त्याचे राजकीय लांगेबांधे असल्याचे फिर्यादी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यास ते फिर्यादीच्या कुटुंबियांना त्रास देतील म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली नव्हती. त्यांनी अद्यापर्यंत फिर्यादीचे जमिनीवरील बोझा कमी केला नाही.

सराफ व्यावसायिकाला 50 कोटी रुपयांची खंडणी

पुण्यातील सराफ व्यावसायिकाला 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पुणे पोलिसांनी मार्च 2020 मध्ये अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात मंगलदास बांदल याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. बांदल याला शिक्रापूर पोलिसांनी 26 मे रोजी अटक केली होती. त्यानंतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना हा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आत्तापर्यंत त्याच्यावर पाच गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

फुकट बिर्याणी मागविणाऱ्या महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची होणार चौकशी

Back to top button