हर्षवर्धन पाटील यांचा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम | पुढारी

हर्षवर्धन पाटील यांचा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाचा पारा दिवसेंदिवस अधिकच चढू लागला आहे. या संघर्षातून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यातूनच आता तालुक्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. राज्यमंत्री भरणे यांनी यामध्ये आघाडी घेतली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, इंदापूर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती स्वाती बापूराव शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई आढाव यांना आपल्या गळाला लावण्यात भरणे यांनी यश मिळवले आहे.

३ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत या सर्वांचा प्रवेश होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीने जय्यत तयारी सुरू केली आहे.

पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी भरणे यांच्यावर नाराज असलेला राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपाकडे खेचून घेतला होता, मात्र त्यांना विजयाने हुलकावणी दिली. भरणे यांच्या पहिल्या फळीतील अनेक जण ऐन निवडणुकीत सोडून गेले तरीही त्यांनी विजयश्री खेचून आणत दुसऱ्यांदा विजयाची पताका फडकावली आहे. कार्यकर्त्यांची कसर भरून काढण्यासाठी भरणे यांनी जातीय समीकरणे जुळवत कार्यकत्यांची नवीन मोट बांधण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

हर्षवर्धन पाटील : भरणेंनी मतांची जुळवाजुळव केली

तालुक्यात मराठा व धनगर समाजाच्या मतांच्या आकडेवारीनंतर माळी व वंजारी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. प्रवेश करणाऱ्या या तिन्ही नेत्यांचे समाजामध्ये चांगले स्थान आहे. श्रीमंत ढोले यांची मोठी शिक्षण संस्था आहे. राजकारणाबरोबरच समाजकारणातदेखील त्यांच्याकडे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे यांचे पती बापूराव शेंडे हे वरकुटे खुर्द गावचे विद्यमान सरपंच आहेत. राणी आढाव या भिगवण जिल्हा परिषद गटात आपले स्थान टिकवून आहेत.

गेल्या वर्षीपासूनच भरणे हे तालुक्यातील प्रत्येक जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादीमध्ये ‘मेगा भरती’ होईल, असे सांगत होते. भाजपला खिंडार पडून मोठे नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या स्वगृही परततील, असे चित्र निर्माण झाले होते, मात्र अजून तरी मोजक्याच नेत्यांनी प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. भरणे यांच्या सततच्या मेगा भरतीच्या वक्तव्यावरून भाजपाच्या ज्येष्ठ मंडळींनी खलबते करत हर्षवर्धन पाटील यांच्याकडून त्यांच्या भेटीगाठी घेत नाराजी दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत.

तीन वर्षांनंतर शरद पवारांची सभा

विधानसभा निवडणुकीच्या वेळी इंदापुरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अत्यंत आक्रमक भाषण करीत इंदापूरकरांना राष्ट्रवादीला मतदान करण्याची साद घातली होती. त्यानंतर तीन वर्षांनी ते जाहीर सभेसाठी इंदापूर तालुक्यात लाखेवाडीत येत आहेत. राज्यमंत्री भरणे यांनी आखलेल्या रणनीतीत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार काय फोडणी घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button