जुन्नर : पुढारी वृत्तसेवा
किल्ले शिवनेरीवर आलेल्या सुमारे 100-150 पर्यटकांवर आग्या मोहळाच्या माश्यांनी हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. 13) दुपारी घडली आहे. सुटीचा दिवस असल्यामुळे गडावर राज्यभरातून आलेले सुमारे 500 पर्यटक होते. जागरूक पर्यटकाने 100 नंबरवर या हल्ल्याबाबत कळविल्यावर जुन्नर रेस्क्यू टीम, जुन्नर वनविभाग तसेच खासगी व 108 सेवेच्या तीन रुग्णवाहिकांमुळे पर्यटकांना तातडीची मदत मिळाली.
गेल्या महिन्याभरात अंबाआंबिका लेण्या, बस्ती (सावरगाव), बोतार्डे, माणिकडोह, शिवनेरी आदी सात ठिकाणी मधमाश्यांनी नागरिकांवर हल्ले केले आहेत. वातावरणातील वाढते तापमान, मधमाश्यांच्या नैसर्गिक आवासावरील मानवी अतिक्रमण किंवा निर्माण झालेले अडथळे तसेच उपद्रवी पर्यटक आदी कारणांमुळे हे हल्ले होत असल्याची शक्यता रेस्क्यू टीमचे रमेश खरमाळे व प्रशांत कबाडी यांनी वर्तविली.
पुण्यातील पर्यटकांनी सांगितले की, दुपारी 1च्या सुमारास शिवजन्मस्थानाजवळ माश्या घोंगावू लागल्या होत्या. थोड्या वेळाने माश्यांची संख्या वाढताच पर्यटकांनी गडावरून खाली येण्यास सुरुवात केली. मात्र, या माश्यांनी त्यांची पाठ सोडली नाही. पर्यटक शिवाईदेवी मंदिर परिसरात, पोहचल्यावर माश्यांची संख्या वाढली. या ठिकाणी असणारी पोळीदेखील उठली असावीत पर्यटकांना खाली आणताना माश्या अगदी वाहनतळापर्यंत पाठलाग करत होत्या.
माजी नगरसेवक संजय साखला, राजकुमार चव्हाण, सुनील औटी, संकेत बोंबले, जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य, रुग्णवाहिका चालक आदींनी मदतकार्य केले. माजी आमदार शरद सोनवणे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली, तर या हल्ल्यात जास्त जखमी झालेल्या लहान मुलांसह सुमारे 50 जखमींना वेळेवर उपचार मिळाल्यामुळे पुढील धोका टळल्याचे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश आगम यांनी सांगितले.