पुणे : विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले सुखरूप बाहेर | पुढारी

पुणे : विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले सुखरूप बाहेर

राजगुरूनगर, (जि.पुणे), पुढारी वृत्तसेवा : जरेवाडी येथील शेतकरी नाथा बबन जरे यांच्या विहिरीत सोमवारी बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. विहिरीत पडलेल्या बिबट्याला जरेवाडी येथील ग्रामस्थ व वन विभागाच्यावतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. शेतकरी नाथा जरे हे विहिरीतील पाणी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी विहिरीत डोकावल्यावर विहिरीच्या दगडावर बिबट्या असल्याचे त्यांनी पाहिले. खेड वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळात बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वनखात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जुन्नर येथून पिंजरा मागवण्यात आला. खेड तालुक्यातील जीवसृष्टी संरक्षण सामाजिक संस्था, खेड वनविभाग तसेच गावातील तरुणांच्या मदतीने विहिरीत दोरीच्या सह्याने पिंजरा सोडला. त्‍यानंतर बिबट्याला एक तासाच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले.

यावेळी, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंधळ, वनक्षेत्ररक्षक एम.जी. वाघुले, पी.एस.कासारे, डी.डी.फापाळे, जी.वाय. कुलकर्णी, वनकर्मचारी ए.आर. गुटटे, एस.के.ढोले, एस.एन. वडजे, के.एस.पवार, कैलास काळे, आर.डी.सातकर, हिरामण आडवळे, अशोक वरुडे, जरेवाडीचे सरपंच अंकुश जरे यांच्यासह गावातील तरुण यावेळी उपस्थित होते. भक्ष्याच्या शोधात किंवा रात्रीच्या अंधारात हा बिबट्या विहिरीत पडला असावा असे वनविभागाने सांगितले आहे.

हेही वाचा  

Back to top button