बारामती : …मृत्यूनंतरही ‘त्याच्या’ शवास मिळाला नाही रस्ता | पुढारी

बारामती : ...मृत्यूनंतरही ‘त्याच्या’ शवास मिळाला नाही रस्ता

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : आपल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता हवा, यासाठी तो व्यवस्थेशी झगडला, झटला तरीही या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने त्याला दाद दिली नाही. अखेर तो निराश झाला व आजारी पडला. घराकडील रस्त्याचा ध्यास घेतच अखेर त्याचा मृत्यू झाला. त्याचे शव घेऊन आलेली शववाहिकाही त्याच्या घरापर्यंत पोहचू शकली नाही. आता प्रशासनाने त्याच्या घराकडील रस्ता खुला करण्यासाठी गुरुवारचा (दि. २४) दिवस नक्की केला आहे. बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील नीलेश बिंटू कर्वे (वय २३) या नाभिक समाजातील युवकाची ही दुर्दैवी कर्मकहानी आहे.

नीलेश त्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नासाठी शासनदरबारी सातत्याने भांडत होता. त्याने ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. अनेकदा हेलपाटे मारूनही त्याच्या हयातीत त्याला घराकडे जाण्यासाठी रस्ता मिळालाच नाही. त्यातूनच तो निराशेत गेला. गत आठवड्यात तो आजारी पडला. आजार बळावल्यावर त्याला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. उपचारांदरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

सोमवारी (दि. २१) त्याचा मृतदेह गावी आणला. परंतु तो घराकडे नेण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. शववाहिकाच ग्रामपंचायतीसमोर आणून थांबविण्यात आली. त्यानंतर पोलिस प्रशासन, महसूल, पंचायत समिती, राजकीय पदाधिकाऱ्यांची पळापळ झाली. अखेर समजूत घातल्यानंतर निलेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निलेशच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर लगतच्या एका व्यक्तीने कुंपण घातले आहे, ते काढावे, असे आदेश तहसीलदार, पंचायत समितीने देऊनही पुढे कार्यवाही झाली नाही. अखेर वडगावचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, पंचायत समितीचे गटनेते प्रदीप धापटे यांनी मध्यस्थी केली. निलेशच्या मृत्यूनंतर अखेर ग्रामपंचायतीने वडगाव पोलिस ठाण्याला पत्र देत २४ फेब्रुवारीला रस्ता काढून देण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

Back to top button