पुणे : 15 हजार 710 कोटी एफआरपी जमा | पुढारी

पुणे : 15 हजार 710 कोटी एफआरपी जमा

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : जानेवारी महिनाअखेर साखर कारखान्यांकडून सुमारे 596 लाख 72 हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले. त्यापोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर तब्बल 15 हजार 710 कोटी 88 लाख रुपये (91.11 टक्के) एफआरपीची रक्‍कम जमा करण्यात आली. सद्य:स्थितीत 1 हजार 532 कोटी 26 लाख रुपयांइतकी (8.89 टक्के) एफआरपीची रक्‍कम देणे बाकी असल्याचे साखर आयुक्‍तालयातून सांगण्यात आले.

चालू वर्ष 2021-22 या हंगामात 30 जानेवारीअखेर सुुरू असलेल्या 191 पैकी 83 साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची शंभर टक्के व त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केलेली आहे, तर साठ टक्क्यांच्या आत म्हणजेच कमी रक्‍कम देणारे 28 साखर कारखाने आहेत. ताज्या एफआरपी अहवालात अशा कारखान्यांना साखर आयुक्‍तालयाने ‘रेड झोन’मध्ये टाकले आहे.

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या माहितीसाठी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी परिपत्रक जारी केले आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना पारदर्शक पद्धतीने राज्यातील साखर कारखान्यांची एफआरपी देण्याची आर्थिक सक्षमता समजावी, या हेतूने चालू हंगामातील जानेवारी 2022 अखेरची एफआरपीची सद्य:स्थिती नमूद केली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातार्‍यातील कारखाने आघाडीवर

एफआरपीची रक्‍कम देण्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील कारखाने आघाडीवर आहेत. त्या खालोखाल सातारा, अहमदनगर, लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे. एफआरपीची शंभर टक्के व त्यापेक्षा अधिक रक्‍कम देणार्‍या कारखान्यांची संख्या जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे. ः कोल्हापूर 16, सांगली 11, सातारा 8, पुणे 6, अहमदनगर 8, उस्मानाबाद 2, सोलापूर 6, लातूर 8, नांदेड 1, हिंगोली 2, परभणी 2, जालना 2, औरंगाबाद 3, नाशिक 2, नंदुरबार 2, जळगाव 1, भंडारा 1, वर्धा 1, यवतमाळ 1.

Back to top button