शरद पवार यांच्या निष्ठावंतांना साताऱ्यानंतर पुण्यातही दगा

लोणी काळभोर, पुढारी वृत्‍तसेवा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याशी सदैव निष्ठावंत असणाऱ्यांना साताऱ्यानंतर पुण्यातही दगाफटका झाला.  हा दगा कसा झााला, ही खेळी कोणी खेळली, याची जाहीर चर्चा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. तसेच एवढी धाडसी राजकीय खेळी करणाऱ्यांची नावेही घेतली जात आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे विश्वासू व निष्ठावंत आ. शशिकांत शिंदे यांना पक्षाच्याच बंडखोर उमेदवाराने पाडले. यानंतर पुणे जिल्ह्यातील शरद पवारांचे विश्वासू निष्ठावंत व पक्षासाठी शरद पवार देतील ती जबाबदारी गेल्या अनेक वर्षापासून पार पाडणारे प्रकाश म्हस्के यांचा पक्षानेच ठरविलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या धोरणाने घात झाला. हे दोन्ही नेते ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मर्जीतले समजले जातात.

साताऱ्यामध्ये शरद पवार यांचे निष्ठावंत पराभूत झाले. त्याची कारणमीमांसा होण्यापूर्वीच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांचा पुणे जिल्हा बँकेतला प्रवेश रोखला गेला, अशी चर्चा पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सुरू आहे. हवेली तालुक्यात तर प्रकाश म्हस्के यांना  मत न देण्याचा निरोप राष्ट्रवादीचे काही नेते मतदारांना देत असल्याने मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती.  तर हवेलीतील दुसरे पराभूत नेते घुले हे खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू समर्थक समजले जातात. तर प्रकाश म्हस्के व सुरेश घुले यांना मतदान न करण्यासाठी नेत्यांचे तथाकथित फोन लावून भीती दाखविण्याचे प्रकार ही घडले आहेत.

शरद पवार व खा.  सुप्रिया सुळे यांचे हवेली तालुक्यातील विश्वासू सहकारी पराभूत झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण, यावर चर्चा झाली. परंतु, एवढ्या पडझडीनंतर ही दोन्ही महत्त्वाची पदे अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात ठेवण्यात खा. सुप्रिया सुळे यशस्वी ठरल्या. पुरंदर व मुळशी तालुक्यात ही पदे दिली. या पदातील एक पद मावळमध्ये देण्याचाही प्रयत्न झाला होता. जिल्ह्याच्या राजकारणात शिरूर, मावळ तसेच पुणे शहर लोकसभा येतात. जिल्ह्यात बेरजेच्या राजकारणात लोकसभा मतदारसंघाप्रमाणे पदांचे वितरण केले जाते. परंतु, या वेळी फक्त बारामतीकडेच बँकेची सूत्रे ठेवल्याने शिरूर, मावळ, पुणे शहर वंचित राहिला.

सुप्रिया सुळे यांनी घेतली दखल

जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत पूर्व हवेलीतील राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी व भाजपशी छुप्या युतीचा फटका अजित पवार यांचे विश्वासू व बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षातील जबाबदारी सांभाळणारे पाहणारे पश्चिम हवेलीतील गोगलवाडी गावचे सरपंच अशोक गोगावले यांना बसला. पूर्व हवेलीतील सोलापूर व नगर महामार्गावरील गावांतील राष्ट्रवादीच्या सरपंचांनी अजित पवार यांचे आदेश असतानाही गोगावले यांना जाणीवपूर्वक डावलले. याची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

Exit mobile version