तुझे बाबा भेटत नाहीत, त्यामुळे राज्यपालांना भेटावे लागते, चंद्रकांत पाटील यांची आदित्य ठाकरेंवर टीका | पुढारी

तुझे बाबा भेटत नाहीत, त्यामुळे राज्यपालांना भेटावे लागते, चंद्रकांत पाटील यांची आदित्य ठाकरेंवर टीका

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत म्हणून आम्हाला राज्यपालांकडे जावे लागते,’ अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सोमवारी केली. दोन वर्षे तीन महिन्यांत केवळ एकदा मुख्यमंत्री फोनवर भेटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र इच्छा असेल तेव्हा भेटतात, असेही पाटील म्हणाले..

नगरपंचायत निवडणुकांत शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हताश आणि निराश झाले आहेत. आपल्या पक्षाचा र्‍हास होताना पाहून ते निराशेतून भाजपवर टीका करून थयथयाट करीत आहेत. त्यांचे रविवारचे भाषण हे आधीच्या दसर्‍याच्या भाषणासारखेच होते, अशी टीका पाटील यांनी सोमवारी पुण्यात केली.

पाटील म्हणाले, एखाद्या माणसाला आपली चूक समजली; पण मान्य करता येत नसेल, तर निराशेतून तो थयथयाट करतो आणि दुसर्‍याला चूक म्हणतो, तसा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडला. नगरपंचायत निवडणुकांत शिवसेना चौथ्या स्थानावर गेली. 41 नगरपंचायतींमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. या निराशेतून ते सोडणार नाही, दाखवून देईन, आमच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, असे बोलत आहेत; पण मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही.

आपण हिंदुत्व सोडले नाही, असे उद्धव ठाकरे यांना सांगायचे असेल तर त्यांनी ते काँग्रेसला सांगावे. मौलाना आझाद महामंडळाला निधी वाढवून देता; पण अण्णासाहेब पाटील महामंडळाला मात्र देत नाही. त्यामुळे ज्या अल्पसंख्याकांचा अनुनय सुरू केला आहे, त्यांनाही हिंदुत्व सोडले नाही असे सांगावे, असा टोला पाटील यांनी लगावला.

Back to top button