विमानतळासाठी चाकण-खेडकरांच्या आशेला पुन्हा पंख | पुढारी

विमानतळासाठी चाकण-खेडकरांच्या आशेला पुन्हा पंख

कोरेगाव भीमा : सुनील भंडारे पाटील

पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घिरट्या चालूच आहेत. विमानतळ टेकऑफ व लँडिंगच्या प्रतीक्षेत चाकण-खेडकरांना पुन्हा आशेचे पंख फुटले आहेत. बडे नेते, शेतकरी वर्ग यांच्या सोशल मीडियावरील चर्चेला उधाण आले आहे. चाकण-खेड, पुरंदरमधील मोठ्या विरोधानंतर विमानतळ सोईस्कररीत्या बारामतीकडे सरकवले होते. पण, तेथेही केंद्रीय सुरक्षा यंत्रणेची नकारघंटा वाजल्यानंतर आता खेड तालुका परिसरातील नेत्यांच्या सोशल मीडियावर मागणीच्या वावड्या उठवल्या जात आहेत.

खेडचे विमानतळविरोधी व शेतकऱ्यांचा दिखाऊ कळवळा दाखवणारे नेते विमानतळ पुरंदरकडे नेल्याने मनातल्या मनात पस्तावाचे लाडू खात एकमेकांवर चिखलफेक करीत होते. स्वतःचा राजकारणाचा सदरा स्वच्छ सफेद असल्याचे ते दाखवत होते. कुणीतरी मध्येच पुन्हा खेडजवळपास विमानतळ व्हावे, ही सुप्त इच्छा प्रदर्शित करीत होते. खेडला विमानतळ होणार म्हणून आपापल्या मर्जीतल्या डेव्हलपर्सना पाबळ, कान्हूर मेसाई भागात पडजमिनी घेण्यासाठी प्रवृत्त करून कित्येक ठिकाणी चढ्या दरात नेते व भांडवलदारांनी प्लॉटविक्रीचे फलक लावले. विमानतळ पुरंदरला गेल्यामुळे गिऱ्हाईकाविना माश्या मारत बसले होते. पुरंदर परिसरात अशीच चढ्या भावात जमिनीची खरेदी करून बसलेले आता पुन्हा विमानतळ होत नाही म्हणून धसका घेऊन बसले आहेत. तिकडेच विमानतळ व्हावे, म्हणून बारामतीच्या पायाशी खेटे घालत आहेत.

School Students : “पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे” : राजेश टोपे

खेड-भोसरी भागाचे नेते मात्र सोशल मीडियावर पाठ थोपटून मोठे काम केल्याचे भासवत आहेत. खरोखरच या आमदार, खासदार नेत्यांना खेडला विमानतळ आणण्यात रस असेल, तर नुसता वरपांगी रस दाखविण्यापेक्षा युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत, अशी खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव भागातील उद्योजक व जनतेची मनोमन इच्छा आहे.

भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी खासदार अमोल कोल्हेंना पत्राद्वारे या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुढाकार घेण्याचे कळविले. कोल्हे यांनी त्यास प्रतिसाद दाखविला. वास्तविक, पुणे शहरापासून जवळ असणाऱ्या चाकण, खेडपासून शिरूर, हवेली, जुन्नर, मावळ भाग हा शहरीकरण, विकसित शेती, औद्योगिकीकरण याबाबतीत सधन असल्याने तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता आहे. केंद्रात आमदार लांडगे यांच्या भाजपची सत्ता, महाराष्ट्रात राष्ट्रवादी व महाविकास आघाडीच्या हातात सूत्रे आहेत.

बारामतीहून खेड-चाकणला विमानतळ आणावयाचे म्हटल्यास पहिले सूत्रधार बारामतीच्या काका-पुतण्यांचे एकमत करून त्यांच्या गळी हा प्रस्ताव उतरला पाहिजे. त्यानंतर एकजुटीने प्रयत्न केल्यास काहीही अशक्यप्राय नसल्याचे या भागातील लहान-मोठे नेते खासगीत बोलून दाखवत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नेते परत चालून आलेल्या संधीचा फायदा घेतात की नुसता टाईमपास करून वेळ निघून जाईपर्यंत एकविचार करण्यात सोशल मीडियावरच व्यक्त होत राहतात, हे भविष्यात कळेलच.

Back to top button