पुणे क्राईम : बबलू गवळी च्या खूनाच्या सुपारीचा डाव फसला - पुढारी

पुणे क्राईम : बबलू गवळी च्या खूनाच्या सुपारीचा डाव फसला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात बबलू गवळी याच्या खूनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चार वर्षापुर्वी गणपती विसर्जनाच्यावेळी आपल्यावर झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन उपाध्यक्ष, भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यादव यांनी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला आपला विरोधक बबलू गवळी याच्या खूनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गवळी हा येरवडा कारागृहात अंडरट्रायल असून, नुकताच कोविड रजेवर बाहेर आला आहे. दरम्यान, कोंढवा पोलिसांनी सतर्कतता दाखवत वेळीच सुपारी किलरचा डाव उधळल्याने मोठा अनर्थ टळला.

अधिक वाचा :

यावेळी दोघा सुपारी किलरकडून तीन गावठी पिस्तूले, जिवंत काडतूसे आणि सुपारी स्वरुपात दिलेली १ लाख २० हजाराची रोकड कोंढवा पोलिसांनी जप्त केली आहे.

या घटनेमुळे शहर आणि राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राजन जॉन राजमनी (वय ३८, रा.भाग्योदय नगर, कोंढवा), इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (२७, रा काळा खडक वाकड,पिंपरी-चिंचवड) या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

नगरसेवक विवेक यादव तसेच मांडवली करून हत्यारे व रोकड पुरविणारा व्यक्ती अशा चौघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहे.

कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांच्या सुचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे पथकासोबत गस्तीवर होते.

त्यावेळी पोलिस कर्मचारी सुनिल धिवार यांना बातमी मिळाली होती की, येरवडा कारागृहातून कोविड रजेवर बाहेर आलेला सराईत गुन्हेगार राजन जॉन राजमनी व त्याचा मित्र इब्राहिम शेख या दोघांनी कोणाच्या तरी खूनाची सुपारी घेतली आहे.

त्यांच्याकडे पिस्तूले आहेत.

त्यानुसार दोघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.

यावेळी दोघांकडून तीन पिस्तूले, काडतूसे व एक लाख २० हजारांची रोकड मिळाली. पोलिसांनी दोघांना ठाण्यात आणून कसून चौकशी केली.

मात्र दोघेही पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे मिळून आलेल्या मोबाईलची पाहणी केली.

त्यामध्ये राजन याने व्हिके व व्हिके न्यू या नावाने सेव्ह असलेल्या दोन मोबाईल क्रमांकावर संशयास्पद संभाषण केल्याचे निदर्शनास आले.

अधिक वाचा :

म्हणून दिली होती सुपारी ?

बबलू गवळी आणि विवेक यादव याच्या दाजीचे २०१४ मध्ये भांडण झाले होते. त्यावेळी गवळी याने यादव याच्या दाजीला मारहाण केली होती.

त्यातूनच यादव याने गवळीला मारहाण केली होती. दरम्यान, २०१७ साली गणपती विसर्जनाच्यावेळी गवळी याने विवेक यादव याच्यावर गोळीबार केला. तेव्हापासून दोघांत वाद सुरू होते.

व्हॉट्सअप चॅटींग अन् खूनाच्या सुपारीचा छडा.व्हीके व व्हीके न्यू नावाने सेव्ह असलेले दोन्ही मोबाईल क्रमांक यादव याचे असल्याचे राजन याने सांगितले.

मी, विवेक यादव व बबलु गवळी एकाच भागात राहतो. एकमेकांचा चांगला परिचय आहे.गवळी याने यादव याच्यावर चार पाच वर्षापुर्वी कॅम्प परिसरात गोळीबार केला होता. त्याचा बदला यादव याला घ्यायचा होता.

राजन येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्हयात २०१५ पासून अजन्म कारावासाची शिक्षा भोगत असून, मे २०२० मध्ये कोविड रजेवर बाहेर आला आहे.

त्याने शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपिल केले असून, शिक्षेत जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता.मात्र तो नामंजूर झाला. कोर्ट कामासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. दोन तीन महिन्यापुर्वी यादव याने राजनला त्याच्या घरी बोलावले.

त्यावेळी यादव त्याला म्हणाला की, बबलु गवळी याचा खुन करायचा, पोलिस स्टेशन ते कोर्ट मी पाहतो. त्याच्या खूनात दुसरी मुले हजर करतो, तसेच तुला तुझ्या कामात मदत करून तुझ्या घरच्यांना पैसे देतो.

त्यामुळे बबलू गवळीच्या खूनाची सुपारी घेण्यास तयार झालो असे राजन याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले.

हायकोर्टाच्या बाहेर चारचाकी गाडीत बसून केला प्लॅन२१ जून रोजी यादव याने राजन याला मुंबई येथे भेटण्यासाठी बोलावले. तेथे त्याने त्याच्या वकिलाचा राजन सोबत परिचय करून दिला.

त्याला मदत करण्याचे सांगितले. चारचाकी गाडीत बसून दोघांनी गवळीच्या खूनाचा प्लॅन रचला. पाच पिस्तूले, काडतूसे व रोकड देण्याचे ठरले. कॅम्प परिसरातच गवळीचा खून करण्याचे ठरले होते.

प्लॅनचा छडा लागू नये म्हणून यादव राजन दोघे व्हॉट्सअप कॉलवर संभाषण साधत होते.

जेलमधील मित्र इब्राहिम याला गवळीच्या खूनाची माहिती दिली.त्यानुसार तो देखील राजन याला साथ देण्यास तयार झाला होता.१ जुलै रोजी यादव याच्या मानसाने राजन याला तीन पिस्तूले, सात राउंड व दोन लाखाची रोकड रामटेकडी ब्रिजजवळ पोहच केली.

Back to top button