पुणे अपघात : स्‍वर्णवला भेटण्यासाठी निघालेल्‍या आत्‍यावर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू - पुढारी

पुणे अपघात : स्‍वर्णवला भेटण्यासाठी निघालेल्‍या आत्‍यावर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

बाणेर येथील अपहरण झालेला चार वर्षीय मुलगा स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोहोचल्याची बातमी मिळाल्यानंतर भाच्याला भेटण्यासाठी रात्री नांदेड वरून निघालेल्या आत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सुनीता संतोष राठोड चव्हाण (वय 36 ) असे त्यांचे नाव आहे. तर त्यांची दोन्ही मुले व पती देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. नगर महामार्गावर त्यांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला.

समर राठोड (वय 14) अमन राठोड (वय ६) हे दोघे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून, त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय व बाणेर परिसरात साजरा केला जात होता. मात्र अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button