Pistol sales : जेलमधील ओळखीनंतर सुरू केली पिस्तुल विक्री | पुढारी

Pistol sales : जेलमधील ओळखीनंतर सुरू केली पिस्तुल विक्री

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : जेलमध्ये ओळख झाल्यानंतर चांडाळ चौकडीने एकत्रित अवैध पिस्तूल विक्रीचा गोरखधंदा सुरू केला. मात्र, पोलिसांनी त्या चौघांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून १४ पिस्तुल हस्तगत केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली. (Pistol sales)

आकाश अनिल मिसाळ (२१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (३०, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (२६, रा. सुतारवाडी, पाषाण), अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता (२८, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Pistol sales : २ पिस्तुल, २ जिवंत काडतुसे, ३ मोबाईल

अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी रोजी वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत होते. याबाबत दरोडा विरोधी पथकातील पोलिस नाईक सागर शेडगे यांना माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, २ पिस्तुल, २ जिवंत काडतुसे, ३ मोबाईल, मिरची पूड आणि नायलॉन दोरी जप्त केली. दरम्यान, आरोपी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात समोर आले.

या गुन्ह्यात आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यावेळी रुपेश पाटील आणि ऋतिक तापकीर यांच्या घरातून आणखी ६ पिस्तुल आणि जिवंत काडतूस मिळाले. तर, आकाश मिसाळ याच्या घरातून चार पिस्तुलांसह जिवंत काडतूस जप्त करण्यात आली.

आरोपी रुपेश पाटील याने भोसरी येथील अजित गुप्ता याला देखील पिस्तुल विकल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी अजित गुप्ता याला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १४ पिस्टल आणि ८ जिवंत काडतुसे असा एकूण चार लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय  शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कौशल्ये, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, नागेश माळी, पोलीस हवालदार शेटे यांच्या पथकाने केली आहे.

Back to top button