भीमाशंकर अभयारण्यात प्रथमच रानगव्याने येळवली ग्रामस्थांना दिले दर्शन | पुढारी

भीमाशंकर अभयारण्यात प्रथमच रानगव्याने येळवली ग्रामस्थांना दिले दर्शन

वाडा ; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रातील येळवली गावाचा परिसर हा गवताळ कुरणे व निमसदाहरित जंगलाने व्यापलेला आहे. या परिसरात सांबर, भेकर, डुक्कर, साळिंदर, ससा, बिबट्या, तरस आदी प्राणी आढळतात. परंतु, प्रथमच या भागात रानगव्याचे दर्शन घडले.

येळवली गावचे सुभाष डोळस, मंगेश सोनवणे व धोंडू बाणेरे यांनी प्रत्यक्ष रानगवा पाहिला. याबाबत भीमाशंकर अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण व वनपाल भीमाशंकर वनरक्षक एन. एच. गिऱ्हे, एस. एस. ससाणे, वनरक्षक गुलाब गोरे यांना दिली. गवा दिसल्याने भीमाशंकर अभयारण्यात नव्याने वन्यजीवाची नोंद झाली आहे.

रानगवा माळशेज घाटातून भीमाशंकर अभयारण्यात आलेला आहे. हा गवा एकटाच असून तो कळप सोडून वाट चुकलेला आहे. स्थानिकांनी गवा दिसल्यास त्याला डिवचू नये. नागरिकांनी समूहाने कामासाठी बाहेर पडावे. आतापर्यंत या गव्याकडून कुठल्याही प्रकारचा उपद्रव झालेला नाही.
वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, भीमाशंकर अभयारण्य.

Back to top button