साखर उत्पादन आणि साखर उतार्‍यात कोल्हापूरची आघाडी - पुढारी

साखर उत्पादन आणि साखर उतार्‍यात कोल्हापूरची आघाडी

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 192 साखर कारखान्यांनी सद्यस्थितीत 594 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. त्यातून सरासरी 9.91 टक्के उतार्‍यानुसार राज्यात 58.84 लाख टन इतके साखर उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी दिली. ऊस गाळप, साखर उत्पादन आणि साखर उतार्‍यात कोल्हापूर विभागाची आघाडी कायम आहे. राज्यात एक हजार 96 लाख टन गाळप अपेक्षित आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 54 टक्के गाळप झाले आहे.

विभागानिहाय साखर उतारा

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 11.26 टक्के साखर उतारा मिळाला आहे. पुणे 10.10 टक्के, सोलापूर 8.95 टक्के, अहमदनगर 9.39 टक्के, औरंगाबाद 9.29 टक्के, नांदेड 9.87 टक्के, अमरावती 8.71 टक्के, नागपूर 8.52 टक्क्यांइतका उतारा मिळाला आहे. सोलापूर विभाग ऊस गाळपात दुसर्‍या स्थानी आणि पुणे विभाग तिसर्‍या स्थानावर आहे.

विभागनिहाय ऊस गाळप (लाख टन) व साखर उत्पादन (लाख क्‍विंटल)

कोल्हापूर विभाग 142.24 -160.12, पुणे 121.05 – 122.24, सोलापूर 141.27 – 126.55, अहमदनगर 80.01 – 75.16, औरंगाबाद 46.90 – 43.56, नांदेड 55.83 – 55.13, अमरावती 4.27 – 3.72, नागपूर 2.29 लाख टन आणि साखरेचे 1.95 लाख क्‍विंटलइतके उत्पादन तयार झालेले आहे.

विनापरवाना गाळप; 16 कारखान्यांना दंड

पुणे : विनापरवाना ऊस गाळप करणार्‍या कारखान्यांवर मंत्री समितीच्या बैठकीत कारवाईचा इशारा देऊनही राज्यातील 16 कारखान्यांनी विनापरवाना गाळप केल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारखान्यांवर एकूण 61.33 कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. राज्यात विनापरवाना ऊस गाळप केल्यास प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे कारखान्यांवर दंडात्मक कारवाई होत आहे. 2021-22 या ऊस गाळप हंगामात 12.32 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक उभे असून गाळपासाठी 1 हजार 96 लाख टन ऊस उपलब्ध आहे. इथेनॉलसाठी सुमारे दहा लाख टन साखर उत्पादनात घट अपेक्षित आहे. एकूण साखर उत्पादन 112 लाख टन होण्याची अपेक्षा आहे.

16 सहकारी साखर कारखाने

पुणे जिल्ह्यातील चार, सातारा एक, सांगली दोन, सोलापूर सात, उस्मानाबाद एक, हिंगोलीमधील एक मिळून सोळा कारखान्यांचा समावेश आहे. यामध्ये चार खासगी आणि बारा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती साखर आयुक्‍तालयातून मिळाली. दरम्यान, साखर आयुक्‍तांच्या आदेशावर कारखाने सहकारमंत्र्यांकडे अपील दाखल करतात. त्या अपिलावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button