Arun Jakhade : मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन - पुढारी

Arun Jakhade : मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : प्रकाशन व्यवसायाला दिशा देणारे, प्रकाशन व्यवसायात आपल्या योगदानाने बदल घडविणारे आणि प्रकाशन व्यवसायाला एका उंचीवर नेणारे पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे (Arun Jakhade) (वय 65) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. आज दुपारी दोन वाजता एंरडंवण्यातील पांडुरंग काॅलनीतील कार्यालयात त्यांचे पार्थीव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या निधनानंतर मराठी प्रकशन विश्वतील ही दुसरी मोठी धक्कादायक घटना असल्याने प्रकाशनविश्वासह साहित्यविश्वाला धक्का बसला आहे.

बालवाडमय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना विविध साहित्य संस्थाचे पुरस्कार मिळाले आहेत. गणेश देवी, डॉ. रा.चिं.ढेरे, व.दि.कुलकर्णी अशा दिग्गज लेखक-संशोधकांचे ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली पद्मगंधा आणि आरोग्य दर्पण हे दिवाळी अंक प्रकाशित व्हायचे.

निसर्गरम्य ग्रामीण भागात त्यांच बालपण गेले. या वातावरणाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. निसर्गातच नाही तर माणसे, जनावरे, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना ‘इर्जिक’ या स्तंभलेखनासाठी झाला.

 Arun Jakhade : विविध विषयांवर लिखाण

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पाचरुट, पावसाचे विज्ञान, प्रयोगशाळेत काम कसे करावे, भारताचा स्वातंत्र्यलढा, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण, विश्वरूपी रबर,शोधवेडाच्या कथा आदी विपुल साहित्य त्यांनी प्रकशित केले.

लेखक खुशवंत सिंग यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भाग्यविधाती, सर्जक आणि संगोपक अशी श्री तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मिथकाची प्रेरकता उलगडणारा डॉ. रा. चिं.ढेरे लिखित श्री तुळजाभवानी हा ग्रंथ देखील पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

Back to top button